Swarajya Kanika Jijau : राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले... यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना त्यांनी अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून जिजाऊंनी स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांस दिले. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसत आहे. 6 फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाबद्दल दिग्दर्शिका अनुजा देशपांडे म्हणतात, “राजा नंतर घडतो, आधी घडते ती राजमाता’’ राजमाता जिजाऊसाहेब या लोकजीवनाला जोडणारी अस्मिता तर आहेतच पण त्याचबरोबर मराठी माणसाला त्याच्या अस्तित्वाची-सामर्थ्याची जाणीव करून देणारी एक शक्ती आहेत . हा अभिमान व जाणीव उराशी बाळगून वीरकन्या ते वीरमातेच्या जीवनकाळचे कथानक 2-2.30 तासात मांडणे एक लेखिका म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक होते . जिजाऊसाहेबांच्या आयुष्यावरील वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे. जिजाऊसाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व ,त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेले प्रसंग-घटना आम्ही प्रेकक्षकांना दाखवणार आहोत. 



एक युगपुरुष घडविणाऱ्या ह्या विलक्षण वात्सल्यमुर्तीला मानाचा मुजरा व साष्टांग प्रणिपात. जिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व अभ्यासत /लिहित असताना माझ्या डोक्यात सारखा विचार असायचा की, 'ही असामान्य भूमिका साकारण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनय असणारी अभिनेत्री मला हवी होती . तेजस्वीनी एक दर्जेदार अभिनेत्री तर आहेच शिवाय एक व्यक्ति म्हणून ती प्रेमळ आहे. त्याचसोबत एक उत्तम मार्गदर्शक व सहाय्यक आहे. तिच्या कामाप्रती ती खूप समर्पित व प्रामाणिक आहे. जिजाऊंचा करारीपणा तिच्यात झळकतो. मला पूर्ण खात्री आहे ती जिजाऊसाहेबांची भूमिका अगदी चोखपणे साकारेल.'


हेही वाचा : VIDEO : अक्षय कुमारनं केला मेट्रोनं प्रवास; तो तुमच्या बाजूलाच होता तरीही ओळखता आलं नाही?


तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल म्हणाली, ‘ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य - स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर अटल राहिल्या. कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे म्हणजेच क्रांती होय !! अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला माझी निवड केली ह्याबद्दल मी अनुजा ताईंची शतशः आभारी आहे. ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूर दृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही .अशा ह्या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच !’