मुंबई : यवनांचं आक्रमण आणि स्वकियांची बंडाळी या सर्वांना पुरुन उरलेल्या संभाजी महाराजांची दखल इतिहासाने हवी तशी घेतली नाही याची रुखरुख आजही अनेकजण बोलून दाखवतात. काय होता हा या राजाचा इतिहास ? इतिहासाच्या पानात काय दडलंय ? याच प्रश्नाचा धांडोळा घेतला जाणार आहे झी मराठीवर नव्याने दाखल होणा-या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेद्वारे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या २४ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता दोन तासांच्या विशेष भागाने या मालिकेचा भव्य शुभारंभ होणार आहे. तर २५ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. ही मालिका झी मराठीसह झी मराठी एचडी वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



कथासूत्र


छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यावर दृष्टीक्षेप टाकला तर एक बाब प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे लहानपणापासूनच अनेक चढ-उतार त्यांच्या आयुष्यात आले. वयाच्या दुस-या वर्षी आईचं छत्र हरवलं मात्र आजी जिजाऊसाहेबांच्या सावलीत स्वराज्याचं बाळकडू त्यांना मिळालं. अवघ्या नवव्या वर्षी मिर्झाराजांच्या गोटात जाऊन स्वराज्यासाठी मोगल मनसबदार झाले. 


दहाव्या वर्षी आग्र्याला शहेनशहा औरंगजेबाच्या दरबारात आपल्या बाणेदारपणानं भल्याभल्यांना चकित केलं. आग्र्याहून सुटकेनंतर मथुरा ते राजगड प्रवास एकट्यानं केला. पण युवराजपदी शंभूराजे विराजमान झाले आणि राजारामांच्या जन्मानंतर सुरु झालेल्या कुटुंबकलहानं डोकं वर काढलं. कारस्थानी कारभा-यांनी स्वार्थासाठी महाराणी सोयराबाईंच्या मातृसुलभ भावनेला फुंकर घातली. 


आरोप आणि बदनामीची धुळवड शंभूराजांच्या आयुष्यात सुरु झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य आणि शंभूराजे दोन्ही पोरके झाले. घरातील वादळ सुरु असतानाच स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, आदिलशहा हे सारे शत्रू एकाचवेळी सज्ज झाले. त्यात भर म्हणून खुद्द शहेनशहा औरंगजेब अफाट सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. 


स्वराज्य धास्तावलं, स्वराज्याला प्रश्न पडला आता काय करेल शिव सिंहाचा छावा ? कसा समोर जाईल या सुलतानी आक्रमणाला ? छातीवर संकट झेलताना घरभेद्यांकडून तर वार होणार नाही ना? काय ठरवेल इतिहास शंभूराजांना स्वराज्यविध्वंसक की स्वराज्यरक्षक ? याच आणि अशाच अनेक प्रश्नांवर आणि त्यांच्या उत्तरांवर या मालिकेचं कथासूत्र आधारलेलं आहे.


 



स्वराज्याबद्दलचं जाज्वल्य प्रेम आणि अभिमानाने भारलेला हा शंभुराजांचा इतिहास प्रेक्षकांना भव्य दिव्य स्वरुपात या मालिकेतून बघता येणार आहे. मालिकेची निर्मिती डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली राव आणि पिंकू बिस्वास यांनी केली आहे. येत्या २४ सप्टेंबरला दोन तासांच्या विशेष भागाने मालिकेचा भव्य शुभारंभ होणार असून २५ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. ही मालिका प्रेक्षकांना बघता येणार आहे आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनीवरुन.