मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची चित्रपट विश्वातील कारकिर्द ही खऱ्या अर्थाने इतरांना हेवा वाटण्याजोगीच होती. विविध धाटणीच्या भूमिकांना न्याय देणाऱ्या श्रीदेवी यांनी नेहमीच आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कारकिर्दीत त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या चित्रपटांविषयी सांगावं तर, 'हिम्मतवाला' या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉक्स ऑफिसवर खऱ्या अर्थाने श्रीदेवी यांची जादू चालवणाऱ्या या चित्रपटाने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली खरी. पण, खुद्द श्री मात्र या चित्रपटाला आपल्यासाठी अशुभ मानत होत्या. 


'श्रीदेवी- क्वीन ऑफ हार्ट्स' या पुस्तकात याविषयी भाष्य करणाऱ्या त्यांच्या एका मुलाखतीचा काही भाग छापण्यात आला आहे. 


१९८७ मध्ये देण्यात आलेल्या एका मुलाखतीत श्रीदेवी यांनी याविषयीचं एक लक्षवेधी वक्तव्य केलं होतं. 


'हिम्मतवाला'च्या वाट्याला आलेल्या यशाने आपण संतुष्ट नसल्याचं त्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या. 


'मी नैसर्गिकरित्या अभिनय करावा, त्यात कोणताही बनावटपणा नसावा अशी तामिळ दिग्दर्शकांची मागणी होती. पण, हिंदी चित्रपटांमध्ये मात्र खूप जास्त ग्लॅमर आणि मसाला असतो. माझंच दुर्दैव म्हणा, की एक व्यावसायिक (हिम्मतवाला) चित्रपट माझ्या कारकिर्दीतील पहिला सुपरहिट हिंदी चित्रपट ठरला होता.'


आपल्याच चित्रपटाकडे पाहण्याच्या एक वेगळा दृष्टीकोन श्रीदेवी यांनी या मुलाखतीत दिला होता. 


'ज्यावेळी मी सदमा या चित्रपटातील भूमिका साकारली होती, तेव्हा हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नव्हता. त्यानंतर मला फक्त ग्लॅमरस भूमिकांसाठीच विचारलं जाऊ लागलं', असं त्या या मुलाखतीत म्हणाल्या होत्या. 


एक दिवस आपणही चांगला अभिनय करु शकतो, असा ठाम निर्धार त्यांनी या मुलाखतीत केल्याचं पाहायला मिळालं. 


ललिता अय्यर लिखित या पुस्तकातील ही बाब सध्या अनेकांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. 


आपल्या पहिल्या चित्रपटाला दुर्दैवी मानणाऱ्या श्रीदेवी या ८० च्या दशकात खऱ्या अर्थाने हीरो नंबर १ होत्या, असा उल्लेखही यात करण्यात आला होता. 


'८० च्या दशकात हिंदी कलाविश्वासाठी वाईट काळ होता. त्याचवेळी श्रीदेवी यांचा या कलाविश्वात प्रवेश झाला आणि त्या खऱ्या अर्थाने हिरो नंबर १ ठरल्या', असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. 


हिंदी भाषेवर प्रभुत्त्व नसतानाही श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये जे स्थान मिळवलं ते खरंच अतिशय प्रशंसनीय आहे.