मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा शेरवानी हिला लाखो रूपयांचा गंडा घालण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एका खोट्या कॉल सेंटरवर धाड टाकली आहे. वेस्टर्न युनियन बॅंकेचा एक एजंट या खोट्या कॉल सेंटरचा मालक होता. त्यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ईशा ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिला ऑस्ट्रेलियातील मोबाईल नंबरवरून फोन करण्यात आला होता. फोन करणारा व्यक्ती स्वत:ला ऑस्ट्रेलियातील कर अधिकारी असल्याचे सांगत ईशासोबत संवाद साधत होता. त्याचप्रमाणे कर न भरल्याचे सांगत तिला फसवण्याचा प्रयत्न देखील करत होता.


तुमचा लाखो रूपयांचा कर थकीत असल्यामुळे तुमच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. ईशाकडून दिल्लीच्या रिया ट्रांसफर आणि वेस्टर्न युनियन मनी ट्रांसफरच्या माध्यमातून दिल्लीतील एका पत्त्यावर दोनवेळा तब्बल तीन लाख रूपये जमा करून घेण्यात आले होते. 


त्याचप्रमाणे ईशाला स्वत:च्या बॅंक खात्यातून अनेक दहशतवादी संघटनांना पैसे देखील पाठवण्यात येत असल्याच्या धमक्या मिळत होत्या. या घटनेसंबंधी पोलीस यंत्रणा अधिक तपास करत आहेत शिवाय या साखळीतील अन्य व्यक्तींचा शोधही घेत आहेत.    


ईशाने 'कृष्णा', 'लक बाय चान्स' या चित्रपटांव्यक्तिरिक्त अन्य चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत. ती उत्तम एरियल नृत्यांगना सुद्धा आहे. बॉलिवूडसोबतच तिने तामिळ आणि मल्याळम चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत.