#MeToo नाना-तनुश्री वादावर पहिल्यांदाच बोलला गणेश आचार्य
`मी तेव्हाही खरा होतो आणि आजही खराच आहे`
मुंबई : कोरिओग्राफर गणेश आचार्यनं मुंबईमध्ये आपल्या इन्स्टीट्युटला आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉन्च केलंय. गणेश आचार्य डान्स अकादमी या नावाची त्याची ही अकादमी भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशातही बॉलिवूड स्टाईल शिकवणार आहे. या निमित्तानं अभिनेता टायगर श्रॉफही उपस्थित होता. यावेळी गणेश आचार्यला त्याच्या चार दशकांच्या बॉलिवूड प्रवासासाठी ट्रिब्युट देण्यात आला. यानंतर झी न्यूजशी बोलताना गणेश आचार्य यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या... उल्लेखनीय म्हणजे, यावेळी नाना-तनुश्री वादाचा साक्षीदार असलेल्या गणेश आचार्यनं पहिल्यांदाच जाहीर भाष्यही केलंय.
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपांवर गणेश आचार्यनं म्हटलंय की, 'मी नेहमी सत्यासोबत आहे. आपण कधीही खोटं बोललेलो नाही...' सोबतच MeToo मोहिमेवर बोलताना गणेशनं म्हटलंय की, या मोहिमेनंतर आपल्या इंडस्ट्रीत अशी कोणताही गोष्ट होणार नाही हे स्पष्ट झालंय.
ज्या पद्धतीनं तनुश्रीनं नानावर आणि माझ्यावर आरोप केले होते त्याला उत्तर आम्ही रिटर्न कम्प्लेंटमध्ये महिला आयोगाकडे सोपवलंय. मी तेव्हाही खरा होतो आणि आजही खराच आहे. आमल्या शूट दरम्यान कोणतीही अप्रिया घटना आम्ही होऊ देत नाही, असंही गणेश आचार्यनं म्हटलंय.
यावेळी, गणेश आचार्य यांनी बीग बी यांच्याबरोबर असलेल्या आपल्या संबंधांविषयीही भाष्य केलं. बीग बींशी आपलं नातं खूप खास आहे. ते नेहमी मला काजू कमी खाण्याचा आणि वजन कमी करण्याचा सल्ला देतात पण मी सध्या जे काजू खातोय तेही त्यांनीच पाठविलेले आहेत, असं म्हणत गणेशनं बीग बींशी आपल्या संबंधांवर जोर दिला.
गणेश आचार्य गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूड अभिनेत्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवत आहे. तो दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरीही ठरलाय.