`मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...`; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा
Timepass 3 Fame Actress : `टाईमपास 3` फेम अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे.
Timepass 3 Fame Actress : 'टाईमपास 3' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलेली अभिनेत्री कृतिका गायकवाड ही आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कृतिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत कृतिकानं ती प्रेग्नंट नसून तिला एक आजार झाल्याचा खुलासा तिनं केला आहे.
कृतिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कृतिकानं काही फोटोंचा एक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओला शेअर करत कृतिकानं कॅप्शन दिलं आहे की "मी गरोदर नाही! तर हे गर्भाशयाचे फायब्रॉइड्स आहे जे काही वर्षांमध्ये हळूहळू मोठं होतं. फायब्रॉइड्स म्हणजे नेमकं काय?"
फायब्रॉइड्स म्हणजे नेमकं काय?
कृतिकानं याविषयी सविस्तर माहिती देत पुढे लिहिले की, "फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयातील muscular tumors अथवा गाठी. फायब्रॉइड्सच्या गाठी म्हणजे कर्करोग असं वाटत असेल तर त्या नाही. फायब्रॉइड्स असलेल्या सगळ्याच महिलांना या संबंधीत काही लक्षणं दिसतील असं नाही. पण ज्या स्त्रियांमध्ये ही लक्षणं आढळतात त्यांना यासोबत जगणं कठीण वाटतं. काहींना खूप वेदना होतात तर काहींना मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो. फायब्रॉइड्सच्या काही गाठी या डोळ्यांना दिसेनाशा असतात, त्यात काही गाठी द्राक्षाच्या आकारा एवढ्या असतात किंवा त्याहुन मोठ्या. जर एखादा फायब्रॉइड हा मोठा होतो तर तो गर्भाशयाच्या बाहेरील आणि आतील भागाला इजा पोहोचवू शकतो. काही गंभीर केसेसमध्ये तर फायब्रॉइड्सच्या गाठी या इतक्या मोठ्या होतात की ओटीपोटापासून पोटापर्यंत वाढतं. तर या गाठीमुळे तुम्ही गरोदर असल्यासारखं असं दिसू लागतं. स्त्रियांनो सावध व्हा, ही सगळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी, स्त्रिरोगतज्ञाकडे जाऊन रेग्युलर चेकअप करत जा."
कृतिकाची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी तिला काळजी घेण्यास सांगितले आहे. अभिनेत्री नेहा नारंग कमेंट करत म्हणाली की कृपया काळजी घे, लवकरात लवकर बरी हो अशी प्रार्थना. अनेक नेटकऱ्यांनी स्ट्रॉंग गर्ल कमेंट केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी काळजी घे आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करतो असं म्हटलं आहे.