नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या युवा नेत्या नुसरत जहाँ पहिल्यांदा लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्या. आज नुसरत यांनी खासदार पदाची शपथ घेतली. वंदे मातरमचे नारे देत नुसरत यांनी शपथ घेण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी स्पीकरलाही नमस्कार केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 जून रोजी तुर्कीमध्ये व्यावसायिक निखिल जैन आणि नुसरत यांचा हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. लग्नामुळे नुसरत लोकसभा शपथ ग्रहणासाठी सहभागी झाल्या नव्हत्या. 20 जून रोजी नुसरत यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.



लग्नाहून परतल्यानंतर नुसरत यांनी आज खासदारपदाची शपथ घेतली. नवविवाहित नुसरत शपथ ग्रहण करण्यासाठी साडी नेसून, हातात चूडा घालून, सिंदूर लावून नववधू रुपात पोहचल्या होत्या. नुसरतशिवाय नवनिर्वाचित खासदार मिमी चक्रवर्ती यांनीही खासदार पदाची शपथ घेतली.



नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदा संसदेत पोहचल्या होत्या. त्यावेळी या दोनही नवनिर्वाचित खासदारांनी संसदेच्या बाहेर फोटो काढले होते. फोटो काढल्यामुळे त्या दोघींनाही ट्रोल करण्यात आलं होतं. 



लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कलाविश्वातील अनेक कलाकारांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. बंगालमधील अभिनेत्री नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांना जनतेने भरघोष मतांनी निवडणून दिलं. नुसरत यांनी पश्चिम बंगालच्या बशीरहाटमधून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. तीन लाखांहून अधिक मतं मिळवून नुसरत जहाँ निवडून आल्या. तर पश्चिम बंगालच्या जाधवपुरमधून तृणमूल काँग्रेसकडून मिमी चक्रवर्ती खासदारपदी निवडून आल्या.