`बबुआ` असा ब्लॉग लिहून बिग बींनी शशी कपूर यांना वाहिली श्रद्धांजली
दिग्गज अभिनेता शशी कपूर यांचे सोमवारी सायंकाळी मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात निधन झाले.
मुंबई : दिग्गज अभिनेता शशी कपूर यांचे सोमवारी सायंकाळी मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी सगळीकडे पसरताच बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. शशी कपूर अनेक दिवस किडनीच्या त्रासाने ग्रस्त होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच बॉलिवू़डमधील महानायक अमिताभ बच्चन श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले.
अमिताभ बच्चन यांनी शशी कपूर यांच्यासोबत 'त्रिशूल' 'सुहाग' आणि 'दिवार' सारख्या सिनेमांमध्ये काम केलेले आहे. शशी कपूर यांच्या निधनानंतर बिग बींनी त्यांना आपल्या ब्लॉगमधून स्मरणात ठेवले.
काय लिहिलंय ब्लॉगमध्ये?
आपल्या ब्लॉगची सुरूवात अमिताभ यांनी रूमी जाफरीच्या दोन पंक्तींमधून केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ''हम ज़िंदगी को अपनी कहाँ तक सम्भालते... इस क़ीमती किताब का काग़ज़ ख़राब था'' अमिताभ बच्चन यांनी शशी कपूर यांना पहिल्यांदा एका मॅगझिन कव्हरवर पाहिले होते. त्यावेळी बिग बी इंडस्ट्रीमझ्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी स्ट्रगल करत होते.
ब्लॉगमध्ये अमिताभ लिहितात की, शशी कपूर यांचा एक फोटो मॅगझीनवर छापला होता. या फोटोत ते मर्सिडिज कारसोबत उभे होते. मॅगझिनचे अर्ध्याहून अधिक पान हे शशी कपूर यांच्या फोटोनेच व्यापला होता. आणि त्यावर लिहिले होते की, राज आणि शम्मी कपूर यांचे लहान भाऊ शशी कपूर लवकरच डेब्यू करणार आहेत. तेव्हा अमिताभ यांना वाटलं होतं की सिनेसृष्टीत जर अशी दिग्गज मंडळी असतील तर मला कोणतीच संधी नाही.
मात्र, कालांतराने या दोघांचीच जोडी पडद्यावर लोकप्रिय ठरली. १९७५ मध्ये "दिवार' सिनेमांत दोघांनी एकमेकांच्या भावांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील शशी कपूर यांचा डायलॉग लोकप्रिय झाला होता आणि तो म्हणजे 'मेरे पास माँ है'
हे सिनेमा ठरले लोकप्रिय
दोघांची जोडी एहसास (१९७९) सुहाग (१९७९) त्रिशूल (१९७८) नमक हलाल (१९८२) रोटी कपडा और मकान (१९७४) या सिनेमांमध्ये होती. तसेच या सिनेमांना प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली.