मुंबई : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार त्याचप्रमाणे राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. शिवाय आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. याचदरम्यान कर्तव्य बजावत असताना अनेक  कोरोना योद्धांना देखील या धोकादायक विषाणूची लागण झाली आहे.  सध्याच्या कठीण परिस्थितीत लोकांमध्ये लढण्यासाठी प्रेरणा यावी म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘तू मंदिर, तू शिवाला’हे गाणं गायलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


‘तू मंदिर, तू शिवाला’ या गाण्याच्या माध्यमातून कोरोना योद्धांचे आभार मानले आहेत.  आशिष मोरे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून राजू सपकाळ यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. यापूर्वी अनेक कलाकारांनी कोरोनावर गाणी प्रदर्शित करून कोरोना विरांचे आभार मानले आहेत. 


दरम्यान, कोरोनाचा प्रसार दिवसागणिक वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला आहे.  आताच्या घडीला भारतात ३७ हजार ३३६ कोरोना रुग्ण आहेत. तर १ हजार २२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर आले आहेत. तर  २६ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.