मुंबई : झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राणा आणि अंजलीने आपलं घर आणि शेतं पुन्हा मिळवल्यानंतर आता हे दोघं एका वेगळ्या कामात व्यस्त असल्याचं दिसत आहे. घरात लहान बाळाला घेऊन यायचं की नाही या गहन प्रश्नावर सध्या गायकवाडांच्या घरी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राणा आणि अंजली बाळाचं प्लानिंग करत असल्यामुळे आपल्या अस्तित्वाला धोका तर निर्माण होईल का अशी मनात भीती बाळगून नंदिता नवीन खलबत करायला सज्ज झाली आहे. त्यामुळे या मालिकेने आता मस्त वळण घेतलं आहे. आणि यामुळेच तुझ्यात जीव रंगला ही मालिका आता प्रेक्षकांच्या पसंतीला अधिक उतरली असून टीआरपीमध्ये देखील ती नंबर वनवर आहे. 


माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला थोड्या फरकाने टाकलं मागे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी मालिकेत पहिल्यांदाच 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने असे काही तरी केलेय जे कोणालाच जमले नाही. जवळपास वर्षभर ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर होती. या मालिकेने टीआरपीमध्ये आपला पहिला नंबर कायम ठेवला होता. मराठी मालिकेच्या इतिहासातील हा एक विक्रमच आहे. मालिका ऑगस्टमध्ये सुरु झाली होती. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचे टायटल वाचूनच याची उत्सुकता वाढली. हळूहळू मालिकेतील पात्रे उलगडत गेली. मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न आले यामुळे हे पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढू लागली आणि ती अद्यापही कायम आहे. 


या अगोदर टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' ही अव्वल स्थानावर होती आणि 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका दुसऱ्या स्थानावर. मात्र आता हे चित्र थोडंस बदललं आहे. आणि 'तुझ्यात जीव रंगला' मालिका नंबर वन असून 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. 'लागिरं झालं जी' ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर 'तुझं माझं ब्रेकअप' ही मालिका आहे.