'जीना यहाँ मरना यहाँ,इसके सिवा जाना कहाँ' राज कपूरवर चित्रित झालेल्या या गाण्याला बरीच वर्ष लोटली तरी आज ही तेवढ्याचं ताकदीने काळजाचा ठाव घेतं. 'मेरा नाम जोकर' या सिमेमातून राज कपूर यांनी कलाकरांच्या आयुष्याचं भीषण वास्तव पडद्यावर साकारलं होतं. एखादा कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आला की, त्याचं आयुष्य चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अर्थाने बदलून जातं. कधी या कलाकारांना यश मिळतं तर कधी आयुष्य निघून गेलं तरी त्यांना त्याच्या कामाची पोचपावती ना प्रेक्षकांकडून मिळत, ना दिग्गजांकडून मिळत. ही मंडळी काळाच्या पडद्याआड निघून गेली, तरी कोणाला काही कळत नाही. अशीच एक हरहुन्नरी कलाकार जिने आपल्या विनोदी शैलीतून अनेकांना खळखळून हसवलं होतं. ती म्हणजे कॉमेडीयन टुनटुन. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ज्यावेळी महिलांनी सिनेमात काम करणं समाजाला खटकत होतं, त्याकाळात अभिनेत्री टुनटुनने आपल्या विनोदी अभिनयानं अनेकांच लक्ष वेधून घेतलं. भारताची पहिली 'लाफ्टर क्विन' म्हणून टुनटुनला ओळखलं जातं. तीचं खरं नाव उमा देवी खत्री असं होतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे आज या लाफ्टर क्विनचा 101 वा जन्मदिन आहे. लिली आणि अरुणच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा 'अंखियों के झरोखों से' या सिनेमात तिने एका जाड्या बाईची  विनोदी भूमिका साकारली होती. या सिनेमातील गाणी आणि कलाकारांच्या अस्सल अभिनयामुळे आजही हा सिनेमा तितकाच लोकप्रिय आहे. 'शामा', 'प्यासा', 'चौधवीन का चाँद' , 'फुल और पत्थर' या आणि अशा बऱ्याच सिनेमातून ती सिनेमात झळकली. पडद्यावर खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्रीचं आयुष्य मात्र तितकच रडवणारं होतं. टुनटुन मुळची उत्तर प्रदेशची होती. जमिनीच्या वादावरुन तिच्या आई वडीलांचा खून झाला. कोवळ्या वयातच मायेचं छत्र हरपलेल्या टुनटुनला आई वडिलांच्या प्रेमाला कायमचं पारखं रहावं लागलं. तिचं लहानपण देखील खूप खडतर गेलं, ज्या नातेवाईकांनी तिला सांभाळलं त्यांनी तिला मोलकरणीची वागणूक दिली.


वाट्याला आलेल्या परिस्थितीमुळे तिला लहानपणीचं जगण्यासाठी लढण्याचं बाळकडू मिळालं होतं. असं म्हणतात की,प्रत्येकात काही ना काही चांगले गुण लपलेले असतात, तसे गुण टुनटुनमध्ये देखील होते. टुनटुनला लहानपणी रेडीओमुळे गाण्याची गोडी लागली.ती गाण्यासोबत गुणगुणत रहायची. अभिनेत्री असण्यासोबतच तिचा आवाज ही गोड होता. वयाच्या तेवीसाव्या वर्षी ती युपीतून मुंबईला पळून आली. रेडीयोने तिला स्वप्नं पाहायला शिकवलं होतं. गोड गळ्यामुळे तिने अनेक गाण्याचं पार्श्वगायन देखील केलं होतं. संगीतकार नौशाना अलीने तिचा आवाज ऐकल्यावर ते भारावून गेले होते. नौशाना यांनी तिला संगीताचं तंत्रशुद्ध शिक्षण दिलं. त्यानंतर टुनटुने 1947 मध्ये 'अफसाना लिख ​​रही हूं दिल-ए-बेकरार का' हे गाणं गायलं. 


हळूहळू दिवस सरकत होते तसंतसं तिने अभिनय क्षेत्रात देखील आपलं नशीब आजमावलं. टुनटुन दिलखुलास होती, त्यामुळे तिचा विनोदी अभिनय नैसर्गिक वाटायचा. 'आवारा' (1951),प्यासा' (1957) 'कसम धंधे की' (1990) या बऱ्याच सिनेमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली. लाफ्टर क्विन म्हणून तिला इंडस्ट्रीत ओळख मिळाली खरी, मात्र या सगळ्या कारकिर्दीत तिला  इंडस्ट्रीने कोणत्याही पुरस्काराने गौरव केला नाही. तिच्या शेवटच्या काळात ती छोट्याशा घरात राहत होती. आजारपणाशी लढताना तिच्याजवळ कोणी नव्हतं. टुनटुनने बॉलिवूडच्या बऱ्याच सिनेमातून लोकांना खळखळून हसवलं, मात्र या गुणी अभिनेत्रीच्या आयुष्याचा शेवट वेदनादायी होता.