मुंबई : 'झी मराठी'वरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. आता ही मालिका एका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. या मालिकेच्या कथानकाने नुकतीच ५ वर्षांची आघाडी घेतली. यानंतर देखील प्रेक्षकांनी मालिकेला भरगोस प्रतिसाद दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच या मालिकेने १००० भागांचा यशस्वी टप्पा पार पडला. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा यामुळे तुझ्यात जीव रंगला या मालिकेने १००० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. याचं सेलिब्रेशन सेटवर पार्टी करून, केक कापून न करता एका वेगळ्या पद्धतीने केलं. हा आनंदाचा क्षण सेटवर पूजा करून साजरा करण्यात आला. याबद्दल बोलताना पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर म्हणाली, "प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे तुझ्यात जीव रंगला या मालिकेने १००० भाग पूर्ण केले. यामध्ये या वास्तूचा देखील खूप मोठा हात आहे. या वास्तूने आम्हाला साडे तीन वर्ष साथ दिली. त्यामुळे या वास्तूचे आभार मानून नवीन एपिसोडची सुरुवात करण्यासाठी आम्ही पूजेचा घाट घातला. रसिक प्रेक्षकांनी आमच्यावर केलेल्या प्रेमासाठी आणि त्यांनी इथंवर दिलेल्या साथीसाठी मी त्यांचे आभार मानते."


राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, "दरवेळी केक कापून किंवा पार्टी करून हा आनंद साजरा करण्यात येतो पण यावेळी आमच्या संपूर्ण टीमने असा निर्णय घेतला कि जिथे आपण शूट करतो तिथे सकारात्मक वातावरण बनवण्यासाठी आपण एक छानशी पूजा आणि होम करून हा आनंद साजरा करूया. म्हणून ही पूजा आम्ही सेटवर केली. १००० भाग पूर्ण केल्याचं सगळं श्रेय मी प्रेक्षकांना देतो, ज्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं."