मुंबई : मालिका आणि चित्रपटांच्या दुनियेत आपलं असं वेगळं स्थान निर्माण करण्यात काही वेब सीरिजना यश मिळालं आहे. किंबहुना या माध्यमाला अनेकांचीच पसंती मिळत आहे. अशा या वेबल सीरिजमधील एक नाव म्हणजे 'ट्रिपलिंग'. टीव्ही एफ या युट्यूब चॅनलवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या वेब सीरिजचं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंदन, चंचल आणि चितवन अशा तीन विभिन्न आणि तितकेच टोकाचे स्वभाव असणाऱ्या भावंडांची ही गोष्ट. या गोष्टीची पार्श्वभूमी ही वेब सीरिज्या पहिल्याच भागात पाहायला मिळाली आहे. तीच गोष्ट पुढे नेत आता या भावंडांच्या सफरीचा नवा टप्पा 'ट्रिपलिंग'च्या नव्या पर्वातून पाहायला मिळणार आहे. सुमित व्यास (चंदन), मानवी गग्रू (चंचल) आणि अमोल पराशर (चितवन) या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणारी ट्रिपलिंगची ही वाट प्रेक्षकांना नेमकी कोणत्या सफरीवर घेऊन जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



'ट्रिपलिंग'च्या दुसऱ्या पर्वाच्या टीझरविषयी सांगावं तर, यामध्ये 'चंदन', 'चंचल' आणि 'चितवन' ही तिन्ही पात्र एका वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. यात एक गोष्ट कायम असल्याचं जाणवत आहे ती म्हणजे 'चितवन'चा खोडकरपणा आणि या तिन्ही भावंडांमध्ये असणारं धमाल नातं. आता हे नातं त्यांना पुढे कोणत्या ठिकाणी पोहोचवतं ते ५ एप्रिलपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अवघ्या काही सेकंदांचाच 'ट्रिपलिंग २'चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावरही तो अनेकांनी शेअर करत या वेब सीरिजप्रती असणारं प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली. हे पाहता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या 'ट्रिपलिंग २'च्या या भन्नाट प्रवासात सहभागी होण्यासाठी तुम्ही तयार आहात ना?