अर्जुन रामपाल आणि प्रेयसीची एनसीबीकडून दोन दिवस चौकशी
अर्जुनची मैत्रीण गॅब्रीयलाचीही एनसीबीनं दोन दिवस चौकशी
देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल मुंबईतल्या एनसीबी कार्यालयात पोहोचला आहे. ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालची चौकशी होणार आहे. याआधी दोन दिवस अर्जुनची प्रेयसी गाब्रियाला हिचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. शिवाय अर्जुनचा मित्र पॉल बार्टेल यालाही काल रात्री अटक करण्यात आली आहे. आता अर्जुन रामपाल आणि पॉल बार्टेल यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. अर्जुनची मैत्रीण गॅब्रीयलाचीही एनसीबीनं दोन दिवस चौकशी केली.
बॉलिवूडचा अभिनेता अर्जून रामपाल आता एनसीबीच्या फेऱ्यात सापडलाय. ड्रग्ज कनेक्शनमुळं त्याला दिवाळीतही एनसीबीच्या वाऱ्या कराव्या लागतायत. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातून बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. या प्रकरणाची चौकशी करताना दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची चौकशी झाली. त्यानंतर काही दिवस एनसीबीचं चौकशीसत्र कमी झालं होतं.
पण गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्जची पाळंमुळं पुन्हा खणून काढण्यासाठी एनसीबी सरसावलीय. फिरोज नाडियादवालाची बायको शबाना सईदला अटक झाली होती. त्यानंतर एनसीबीनं अर्जूनच्या घरी छापा टाकला. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला आणि मित्र पॉल बार्टेल यांची एनसीबीनं झाडाझडती घेतली.
एनसीबीला अर्जून रामपालच्या घरी बंदी घातलेली औषधं सापडली होती. या औषधांबाबत तो समाधानकारक उत्तर देतो की नाही यावर अर्जूनचं भवितव्य अवलंबून आहे.
अर्जून रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला आणि अर्जूनच्या पार्ट्या हा बॉलिवूडमधील चर्चांचा विषय होता. या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचं सेवन होत असेल त्याची मोठी किंमत अर्जून रामपालला मोजावी लागणार आहे.