नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या सिनेमाच्या टीमची बेट घेतली. मंगळवारी सेना दिवसाच्या निमित्तानं त्यांनी ही भेट घेतली. सेना प्रमुख बिपिन रावत यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ही भेट घडली. सिने अभिनेता विक्की कौशल, यामी गौतम, दिग्दर्शक आदित्य धर आणि निर्माता रोनी स्क्रूवाला यावेळी हजर होते. निर्मला सीतारमण यांनी ट्विटरवर सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. या सिनेमाबद्दल 'खूप कौतुक ऐकल्याचा' उल्लेखही त्यांनी यावेळी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेना दिनाला बिपिन रावत यांच्या घरी सिनेमा 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' टीमसोबत. अद्याप हा सिनेमा पाहिलेला नाही पण खूप कौतुक ऐकलंय. रोनी स्क्रूवाला, आदित्य धर, विक्की कौशल, यामी गौतम यांचं आपल्या सैनिकांप्रती भावना व्यक्त करणारा सिनेमा निर्माण करण्यासाठी अभिनंदन' असं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विटरवर म्हटलंय. 


ही पोस्ट शेअर करताना अभिनेता विक्की कौशलनंही 'तुमच्याशी भेट ही सन्मानजनक गोष्ट आहे' असं म्हटलंय. तर यामी गौतम हिनं लिहिलंय 'आम्हाला तुम्हाला भेटून गौरवास्पद वाटत आहे आणि उत्साहवर्धक शब्दांसाठी आभार. देशासाठी तुम्ही जे करत आहात ते केवळ अतुलनीय आहे'.


भारतीय सेनेद्वारे पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या खऱ्या घटनेवर 'उरी' या सिनेमाचं कथानक बेतल्याचं म्हटलं जातंय. उरी हल्ल्यात भारताचे १७ सैनिक ठार झाले होते. 'उरी' या सिनेमात परेश रावल आणि मोहित रैना यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा ११ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.