`तानाजी...` चित्रपटावर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची प्रतिक्रिया
रविशंकर प्रसाद यांची ट्विटरद्वारे प्रतिक्रिया
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn)'तानाजी: द अनसंग वॉरियर'ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. बॉक्सऑफिसवरही चित्रपट चांगली कमाई करतोय. गेल्या ६ दिवसांत चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर हरियाणा सरकारने चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. महाराष्ट्रातही चित्रपट टॅक्स फ्री होणार आहे. चित्रपटाबाबत सर्वांच्याच चांगल्या प्रतिक्रिया येत असताना केंद्रीय मंत्री मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 'तानाजी: द अनसंग वॉरियर' पाहिल्यानंतर कौतुकास्पद प्रतिक्रिया दिली आहे.
'तानाजी...' पाहिल्यानंतर रविशंकर प्रसाद यांनी अजय देवगनला टॅग करत एक ट्विट केलं आहे. तान्हाजी मालुसरे यांचं विलक्षण धैर्य चित्रपटाच्या माध्यमातून सुंदररित्या दाखवलं असल्याचं सांगत, रविशंकर यांनी चित्रपटातील संपूर्ण टीमचं, अजयचंही उत्तम अभिनयासाठी कौतुक केलं आहे.
रविशंकर यांच्या ट्विटवर अजय देवगनने 'तानाजी...'च्या संपूर्ण टीमकडून त्यांचे आभार मानले आहेत.
'तानाजी: द अनसंग वॉरियर' १० जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशीच चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. 'तानाजी...' अजयचा १००वा चित्रपट असून या चित्रपटाने १०० कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. १०० कोटींच्या घरात एन्ट्री करणारा 'तानाजी...' २०२० मधला पहिला चित्रपट ठरला आहे.
'तानाजी...' चित्रपटाचं ओम राऊत यांनी दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात एक-एक सीनवर अतिशय बारकाईने काम करण्यात आलं आहे. तानाजी मालुसरे यांची वीरगाथा, मावळ्यांची शूरवीरता दाखवण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे. अजयशिवाय चित्रपटात काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे, सैफ अली खान, नेहा शर्मा, पद्मावती राव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.