मुंबई : अभिषेक कपूर दिग्दर्शित 'केदारनाथ' या चित्रपटाच्या निमित्ताने उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर परिसरात आलेल्या महाप्रलयावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. पण, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या वाटेत असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या मुद्द्यांवरुन करण्यात आलेल्या तक्रारींच्या तपासणीकरता उत्तराखंड राज्यशासनाकडून चार सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. 


सदर समितीकडून तक्रारींविषयीचा अहवाल दिल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. या समितीमध्ये उत्तराखंडचे पर्यटन विकास मंत्री सतपाल महाराज, गृहसचिव नितीश झा, माहिती सचिव दिलीप जवळकर आणि पोलीस महानिरीक्षक अनिल रातुरी यांचा सहभाग आहे. 


७ डिसेंबरला 'केदारनाथ' प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून, सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. 



चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि सुशांतचं एक चुंबनदृश्य असून, त्यामुळे अनेकांनीच या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली होती. ज्यानंतर उत्तराखंडमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावरच बंदी आणण्याचीही मागणी करण्यात आली. सदर चित्रपट हा लव्ह जिहादला प्रेरणा देत असल्याचा आरोप करत त्याचा विरोध केला जात आहे. त्यामुळे आता या अडचणी कधी कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.