तृप्ती गायकवाड,झी मीडिया,मुंबई :  Zee Marathi Serial Title Song : मालिकांच्या शीर्षक गीतांनी एक काळ गाजवला होता. अजूनही झी मराठीच्या जुन्या मालिकांशी प्रेक्षकांचं आणि कलाकारांचं ही अतूट नातं आहे. मालिकेच्या यशामध्ये सिंहाचा वाटा हा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचा आहे. तेवढंच श्रेय हे मालिकेच्या गीतकार आणि संगीतकारांना जातं.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठीवरील मालिकांच्या शीर्षक गीतांनी प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातली. गाणं ऐकणाऱ्याला शब्द आणि संगीतामध्ये खिळवून ठेवणारे हे जादूगार म्हणजे गीतकार मंगेश कुलकर्णी आणि संगीतकार अशोक पत्की. झी मराठीवरील मालिकांच्या जवळपास सगळ्याच शीर्षक गीतांना अशोक पत्की यांचं संगीत आहे.

2003 मध्ये सुरु झालेल्या वादळवाट मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. रात्री 9 च्या ठोक्याला प्रत्येक घरातल्या टीव्हीवर या मालिकेचं गाणं ऐकू यायला लागलं. सलग तीन वर्षे मालिकेवर रसिकांनी भरभरून प्रेम केलंच पण  मंगेश कुलकर्णी आणि अशोक पत्की यांच्या शब्दांवर आणि संगीतावर आजही तितकंच भरभरून प्रेम दिलं जातं.

शब्द आणि संगीत काळजाचा ठाव घेतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे झी मराठीच्या मालिकांची शीर्षक गीतं. वादळवाट मालिकेचे  गीतकार मंगेश कुलकर्णी यांनी  एसटीमधून प्रवास करताना चक्क तिकिटावर या गाण्याचे शब्द लिहिले होते. संगीतकार जसा शब्दांना तालासुरात चाल देतो, तितकंच त्या शब्दात आपल्या आवाजातून जीव ओतण्याचं काम गायक करत असतो. देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर या अष्टपैलू गायकांच्या आवाजातलं हे गाणं ऐकताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.

एखादी कलाकृती घडवताना सह कलाकारांचं एकमेकांशी असलेलं बॉडिंग कसं आहे ते त्यांच्या कामातून दिसून येतं. लेखकाला नक्की काय म्हणायचं ते दिग्दर्शक, अभिनेते, गीतकार आणि संगीतकार जेव्हा अचूकपणे समजून घेतात तेव्हा नेमकेपणाने ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे ती कलाकृती पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.

मालिकेला 20 वर्ष होऊनही आजही कुठे ना कुठे कोणाचा फोन वाजला की कानावर या गाण्याचे शब्द पडतात...
"थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले,
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले"...

मंगेश कुलकर्णी, अशोक पत्की, मंदार देवस्थळी, शशांक सोळंकी, अभय परांजपे,गौतम कोळी आणि इतर मातब्बर कलाकार मंडळी यांनी वादळवाट मालिका प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत ठेवली आहे. चौधरी कुटुंब आणि त्यांचा आठवण बंगला अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. वादळवाट मालिका आजच्या प्रेक्षकांच्या हृदयाचा हळवा कप्पा आहे.