मुंबई : 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार फटकेबाजी करतोय. पहिल्या केवळ पाच दिवसातं या सिनेमानं ५२ कोटींचा व्यवसाय केला. त्यामुळे सिनेमाचा भाग असलेले सर्वच कलाकार खूपच आनंदात आणि उत्साहात आहेत. या सिनेमाचं यश हे 'कॉफी आणि बरंच काही'फेम मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादीसाठीही महत्त्वाचं ठरलंय. आपल्या बॉलिवूड करिअरसाठी हा एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो, असं खुद्द वैभवला वाटतंय. 


दुसऱ्याच एका भूमिकेसाठी झाली होती विचारणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी न्यूज'शी बोलताना वैभवनं याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. 'मणिकर्णिका' या सिनेमात वैभवला पूरन सिंहची भूमिका निभावलीय. परंतु, वैभवला अगोदर या भूमिकेसाठी नव्हे तर दुसऱ्याच एका भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. या भूमिकेसाठी वैभवला मुंडण करण्याची आवश्यकता होता. परंतु, त्यावेळी वैभव इतरही काही सिनेमांमध्ये काम करत होता. त्यामुळे मुंडण करणं त्याला शक्य नव्हतं. त्यामुळे त्यानं या भूमिकेला नकार दिला. 



१० दिवसांनंतर 'मणिकर्णिका' टीमनं पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला... आणि वैभवनं जास्त विचार न करता 'हो' म्हणून टाकलं. बॉलिवूडमध्येही मोठ्या पडद्यावर वैभवला प्रेक्षकांकडून खूपच चांगली दाद मिळालीय. या सिनेमात भूमिका छोटी असली तरी एक संपूर्ण गाणं वैभववर चित्रीत करण्यात आलंय. 


...म्हणून 'मणिकर्णिका' स्पेशल


याआधीही वैभव बाजीराव-मस्तानी या सिनेमात 'चिनप्पा' या ऐतिहासिक भूमिकेत दिसला होता. त्यामुळे बॉलिवूडमध्ये नेहमी ऐतिहासिक सिनेमांतच का दिसतो? या प्रश्नावर वैभव म्हणतो, की सध्या ज्या ऑफर आपल्याला मिळत आहेत त्यापैंकीच निवड करावी लागते. याशिवाय 'हंटर' आणि 'लिपस्टिक अंडर माय बुर्का' या सिनेमांतही वैभव महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसला होता. परंतु, या सिनेमांतून मात्र त्याला तेवढी ओळख मिळाली नाही जेवढी 'मणिकर्णिका'नं दिलीय. 



सध्या वैभव स्वत:च्या प्रोडक्शन हाऊससाठीही मेहनत घेतोय. सोबतच बॉलिवूडमधून आणखीन चांगल्या संधी आपल्याला मिळतील, अशी आशा त्याच्या मनात निर्माण झालीय. 


कंगना रानौत अभिनित आणि दिग्दर्शित 'मणिकर्णिका' हा सिनेमा २५ फेब्रुवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय.