Vaibhavi Upadhyaya Accidental Death: 'साराभाई व्हेर्सेस साराभाई' मालिकेच्या दुसऱ्या पर्वामध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेली अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा (Vaibhavi Upadhyaya) भीषण कार अपघातामध्ये मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथील बंजरा परिसरामधील सिधवान येथील दरीमध्ये वैभवीची कार दरीत पडल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र वैभवीने केलेल्या एका चुकीमुळेच तिला प्राण गमावावे लागल्याची माहिती आता समोर आली आहे. यासंदर्भातील खुलासा वैभवीचा मित्र आणि 'साराभाई व्हेर्सेस साराभाई' मालिकेचे दिग्दर्शक जे. डी. मजेठिया यांनी केला आहे. 


तिचा प्रियकर वाचला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये वैभवीच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला जे. डी. मजेठियाही उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रकने वैभवी आणि तिच्या होणाऱ्या पतीच्या कारला घाटामध्ये धडक दिल्याचं सांगितलं. या धडकेमुळे वैभवीची कार दरीत कोसळली. या अपघातात वैभवीचा होणाऱ्या पतीला किरकोळ दुखापत झाली. मात्र गंभीर दुखापतीमुळे वैभवीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पण वैभवी गंभीर दुखापतग्रस्त होण्यामागील कारणाचा खुलासा मजेठिया यांनी केला आहे. वैभवीने अपघात झाला त्यावेळेस सीट बेल्ट लावला नव्हता असं मजेठिया यांनी सांगितलं. 


ती एक चूक जीवावर बेतली


"ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर हिमाचलमध्ये होती. ते दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार होते. घाटातील रस्ता अरुंद असल्याने त्यांनी कार वळणावर उभी करुन ट्रकला जाण्यासाठी जागा मोकळी करुन दिली. मात्र ट्रक पुढे निघाल्यानंतर त्याचा मागील भाग वैभवीच्या कारला लागला आणि कार दरीत कोसळली. कारने अनेकदा पलटी मारली. मात्र तिने (वैभवीने) सिटबेल्ट लावला नसल्याने तिला गंभीर दुखापत झाली," असं मजेठिया म्हणाले. 'ईटीटाइम्स टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मजेठिया यांनी, "वैभवीच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर तिला कार्डीअॅक अरेस्ट आला," असंही म्हटलं आहे. तसेच, "वैभवी ही एक उत्तम अभिनेत्री होती. काल रात्री मला मिळालेली बातमी चुकीची असावी आणि हे एक वाईट स्वप्न असावं अशी माझी इच्छा आहे. नियती किती क्रूर आहे," असंही मजेठिया यांनी म्हटलं. 



तिने खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण...


वैभवीच्या गाडीला झालेल्या अपघातासंदर्भात पीटीआयशी बोलताना कुल्लूच्या पोलीस निरिक्षक साक्षी वर्मा यांनी सविस्तर माहिती दिली. "वैभवीने कारबाहेर पडण्याचा प्रयत्ना केला. तिने खिडकीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळेच तिचा मृत्यू झाला. तिला बंजार सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं," असं साक्षी म्हणाल्या. तसेच, "एका वळणावर गाडी दरीत कोसळल्याने अपघात झाला" असंही साक्षी यांनी सांगितलं.


'साराभाई व्हेर्सेस साराभाई' बरोबरच 'क्या कसूर है अमल का' आणि 'प्लिज फाइंड अटॅच' आणि 'छपक' चित्रपटातही वैभवीने काम केलं होतं.