ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं बुधवारी सकाळी 7.30 सुमारास निधन झालं.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं बुधवारी सकाळी 7.30 सुमारास निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. हिंदुजा रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना आणि समस्त कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. दिलीप कुमार यांची तब्बेत गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होती.
त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सायरा बानो देखील रूग्णालयात होत्या. आजारपणात त्यांनी दिलीप कुमार यांची साथ दिली. जेव्हा दिलीप कुमार रूग्णलयात उपचार घेत होते, तेव्हा देखील सायरा बानो यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलीप कुमार यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं. दिलीप कुमार यांना दीर्घकाळापासून बाइलेटरल प्लूरल इफ्यूजन ही समस्या होती.
दिलीप कुमार यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. दिलीप कुमार यांचं निधन हा संपूर्ण सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. गेल्यावर्षी दिलीप कुमार यांनी आपल्या दोन भावांना गमावलं आहे. 88 वर्षांचे असलम खान आणि 90 वर्षांचे एहसान खान यांच कोरोनामुळे निधन झालं होतं.