मुंबई : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं आहे. कॅनडातील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कादर खान यांचा जन्म काबुलमध्ये झाला होता. १९७३ मध्ये राजेश खन्ना यांच्या 'दाग' या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. कादर खान यांनी आपल्या कारकीर्दीत ३०० हून अधिक सिनेमांत काम केलं. इतकंच नाही तर त्यांनी २५० हून अधिक सिनेमांसाठी संवाद लिहिले आहेत. २५० हून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी संवादलेखनाची जबाबदारीही पार पा़डली. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी रणधीर कपूर आणि जया बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'जवानी दिवानी' या चित्रपटासाठी संवाद लेखन केलं होतं. 



८१ वर्षांच्या कादर खान यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास उदभवल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी व्हेंटिंलेटरवर ठेवलं होतं. ते Progressive Supranuclear Palsy या व्याधीपासून त्रस्त होते. ज्यामुळे त्यांचा वारंवार तोल जात असून, चालण्यातही अडथळा येत असल्याचं सांगितलं जात होतं. 


खान यांच्या प्रकृती अस्वास्थ्याविषयी माहिती मिळताच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचताच अनेकांनीच चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करत त्यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केला होती. 


मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच चित्रपटांसाठी एकत्र काम केलं. देसाई यांच्यासोबत 'धरम वीर', 'गंगा जमुना सरस्वती', 'कूली', 'देश प्रेमी', 'सुहाग', 'परवरिश', 'अमर अकबर अँथनी' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. तर मेहरा यांच्यासोबत 'ज्वालामुखी', 'शराबी', 'लावारिस' आणि 'मुकद्दर का सिकंदर' हे त्यांचे गाजलेले चित्रपट ठरले.