प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : तुम्ही तुमच्या आज्जीला पाहिलं असेल किंवा नसेल, मात्र मराठी पडद्यावरच्या एका माऊलीकडे पाहून नक्की आपल्या सर्वांना आज्जीची आठवण व्हावी अशी एक अभिनेत्री. होय आपण बोलतोय चित्र माऊलीबाबत..म्हणजेच सुलोचना दीदींबाबत. भारतीय सिनेसृष्टीच्या शंभर वर्षांच्या आजवरच्या इतिहासात तब्बल ७०-७५ वर्षांच्या साक्षीदार असलेल्या सुलोचनादीदी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीदींनी सातत्याने अभिनयाचा छंद जोपासत मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीशी आपलं नातं टिकवून ठेवलंय. त्याबरोबरच मतदानाच्या दिवशी इतरत्र फिरायला जाणारे, मतदानाला दांडी मारणारे अनेकजण आपण पहातो. सुलोचनादीदी यापैकी नाहीत. 


याही वयात अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही वयाची नव्वदी पार असतानाही दीदींनी मतदानासाठी मतदान केंद्रावर मोठ्या आनंदाने, उत्साहाने हजेरी लावली. 


सुलोचनादीदींनी जुन्या पिढीतील दिग्गज अभिनेत्यांसह बॉलिवूडचे अमिताभ बच्चन यांपासून ते धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, शशी कपूर आदींसोबत पडद्यावर तोडीस तोड अभिनय केलाय. 


खानदानी अभिनय आणि विनम्र स्वभाव यामुळे भारतीय सिनेसृष्टीत दीदींनी मानाचं स्थान मिळवलंय. नुकताच त्यांनी ९१वा वाढदिवस साजरा केला. कृष्णधवल सिनेमा होता त्या काळापासून ते रंगीत सिनेमापर्यंतच्या साक्षीदार असलेल्या सुलोचनादीदी म्हणूनच वेगळ्या ठरतात.  


मराठी मातीतील शालीनता, घरंदाज अभिनय आणि सोज्वळतेचा चेहरा म्हणजे सुलोचना दीदी...


सुलोचना दीदींचं मूळ नाव सुलोचना लाटकर. कोल्हापूरमधल्या खडवलट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला. २५० हून अधिक मराठी आणि १५० हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. 


तंबुतल्या चित्रपटाने सुलोचना दीदींना चित्रपटांची ओढ निर्माण केली. पण त्यांचं खरं शिक्षण झालं ते गुरु भालजी पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली.


जय भवानी या सिनेमातून सुलोचना दीदी नायिका म्हणून समोर आल्या. मराठा तितुका मेळवावा या सिनेमातल्या जीजाऊंच्या भूमिकेमुळे सुलोचना दीदींचं वेगळं रुप समोर आलं. 


त्याशिवाय वहिनीच्या बांगड्या, भाऊबीज, बाळा जोजो रे, चिमणी पाखरं, प्रपंच, स्त्री जन्मा तुझी ही कहाणी, पारिजातक हे दीदींचे तुफान गाजलेले चित्रपट. मोलकरीण आणि एकटी या सिनेमात दीदींनी साकारलेली सोशिक आईची भूमिका म्हणजे केवळ लाजवाब..


मराठीप्रमाणेच हिंदी पडदाही सुलोचना दीदींनी गाजवला. बिमल रॉय यांच्या सुजाता चित्रपटात त्यांनी साकारलेली संवेदनशील आईची भूमिका बरीच गाजली. हिंदी चित्रपटांमध्ये त्या पडद्यावर अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर या आघाडीच्या नायकांच्या त्या आई झाल्या. 


सुलोचना दीदींना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. आता त्यांच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्याची. 


दीदी त्या स्वतःहून मागणार नाहीत हेदेखील तितकंच खरं. आतापर्यंतचे काही अपवाद वगळता दादासाहेब फाळके पुरस्कारासारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार कलाकाराला मिळतो तो व्हील चेअरवरच ही शोकांतिका. 


खरंतर अशावेळी आपण नेमका कोणता पुरस्कार स्वीकारतो आहोत, याची जाणीवही आणि आनंदही खुद्द त्या कलाकारालाही मिळत नाही. अशावेळी अशा वयात असे पुरस्कार देण्यात काय हशील आहे असा प्रश्न पडतो. 


दीदींनी नव्वदी पार केली असली तरी त्यांचा सध्याचा उत्साह हा कौतुकास्पदच आहे. अजुनही त्या चित्रपट, मालिका, नाटकं आवडीने पाहतात. 


म्हणूनच एकाचवेळी खानदानी तेज, करारीपणा, घरेलू साधेपणा, आणि पराकोटीची सोशिकता आपल्या अभिनयातून दाखवलेल्या सुलोचनादीदींना तो यंदाच्या वर्षी तरी शासनाची ही पुरस्काररुपी भेट मिळावी हीच अपेक्षा. दीदींचा ९१व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.