ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा
आपल्या अभिनयानं एक काळ सिनेसृष्टीवर राज करणाऱ्या वत्सला देशमुख यांनी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन झालं आहे. एकेकाळी मराठी सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणाऱ्या वत्सलाताई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
'तुफान और दिया' या चित्रपटापासून त्यांनी आपल्या करियरची सुरुवात केली होती. फायर, नागपंचमी, जल बिन मछली नृत्य बिन बिजली असे त्यांनी एकापाठोपाठ हिट चित्रपट दिले. पिंजरा सिनेमातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यावेळी पिंजरा हा सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतला होता. त्यांचे पिंजरा सिनेमातील संवाद सुपरहिट ठरले आणि त्यामुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली.
वत्सला देशमुख यांना अमेय खोपकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वास एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अमेय खोपकर काय म्हणाले?
'वत्सला देशमुख ह्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख हिच्या आई होत्या. त्यांनी आपल्या करीअरची सुरुवात हिंदी चित्रपट तुफान और दिया या चित्रपटातून केली होती. मग त्यांचे फायर, नागपंचमी, जल बिन मच्छली नृत्य बिन बिजली असे अनेक चित्रपट त्यावेळी गाजले होते.'
'पण खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती सुहाग ह्या चित्रपटातून त्यांचे नाव घरोघरी पोहचले होते.मग त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटात सुद्धा काम केले होते. अश्या हूरहुन्नरी अभिनेत्री च्या जाण्याने चित्रपट क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून *महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.'