ज्येष्ठ अभिनेते विशाल आनंद यांचं निधन
त्यांचं खरं नाव....
मुंबई : १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चलते चलते', या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता विशाल आनंद यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी म्हणजेच ४ ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते प्रदीर्घ काळापासून आजारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
भीष्मम कोहली असं त्यांचं खरं नाव. ते जवळपास ११ हिंदी चित्रपटांतून झळकले होते. 'चलते चलते' आणि 'टॅक्सी ड्रायव्हर' हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट. अभिनेता म्हणून या कलाविश्वात योगदान देण्यासोबतच त्यांनी चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही योगदान दिलं आहे.
विशाल आनंद यांना वेगळी ओळख देणाऱ्या 'चलते चलते' या चित्रपटातून त्यांनी सिमी गरेवाल, नाझनीन आणि श्रीराम लागू या कलाकारांसह स्क्रीन शेअर केली होती. सुंदर दर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तर, खुद्द आनंद यांनीच चित्रपटाची निर्मिती केली होती.
'हमारा अधिकार', 'सा रे ग म प', 'हिंदुस्तान की कसम', 'दिल से मिले दिल' आणि 'किस्मत' यांसारख्या चित्रपटांमध्येही आनंद यांचं योगदान होतं. हिंदी कलाविश्वात बप्पी लहिरी यांना पहिली संधी देणारी व्यक्ती म्हणजे विशाल आनंद. अभिनेता पूरब कोहली हा विशाल आनंद यांचा भाचा आहे. अशा या या कलाप्रिय अभिनेत्याला अनेकांनीच श्रद्धांजली वाहिली आहे.