मुंबई : मराठी चित्रपट आणि मालिकांच्या विश्वात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या आणि कलाजगतामध्ये समृद्ध योगदान देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं मंगळवारी (11 जानेवारी 2022)ला निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अग्गंबाई अरेच्चा', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या चित्रपट आणि मालिकांतील भूमिकांमुळे त्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. 


रेखा कामत यांनी साकारलेली 'आजी', 'माई' कायम सर्वांनाच हवीहवीशी वाटली. 


एका हरहुन्नरी आणि तितक्याच अनुभवी अभिनेत्रीच्या जाण्यानं कला जगतातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. 


कुमुद सुखटणकर हीसुद्धा रेखा कामत यांचीच ओळख. पटकथा लेखक सी. आर. कामत यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली होती. 


अभिनेत्री चित्रा नवाथे या रेखा कामत यांच्याच सख्ख्या भगिनी. मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ या दोन्ही बहिणींनी, अभिनेत्रींनी खऱ्या अर्थानं अनुभवला. 


1952 मध्ये रेखा कामत यांनी मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं होतं. विविध नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. 


काही वर्षांपूर्वीच आरोग्याच्या तक्रारींमुळं त्यांनी अभिनयापासून दुरावा पत्करला होता. असं असलं तरीही त्या मनानं मात्र या कलेशी कायमच जोडलेल्या राहिल्या. 


रेखा कामत या आज आपल्यात नसल्या तरीही त्यांनी साकारलेल्या भूमिका मात्र कायमच त्यांची साक्ष देत राहतील. 


अशा या हसतमुख अभिनेत्रीला झी 24 तासकडून भावपूर्ण श्रद्धांजली.