मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्य वर्तुळात आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांनी या जगाचा निरोप घेतला. मृत्यूसमयी त्याच ८४ वर्षांच्या होत्या. रूई या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरोज सुखटणकर यांनी आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत जवळपास ९० हून अधिक मराठी चित्रपट आणि ६० हून अधिक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या 'नर्तकी' या अतिशय लोकप्रिय नाटकाचे जवळपास ३०० हून अधिक प्रयोग पार पडले होते. अनेक दिग्गजांसमवेत काम करण्याची संधी मिळालेल्या सुखटणकर यांनी बहुतांश चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्री म्हणून भूमिका निभावल्या. 


'प्रेमा तुझा रंग कसा', 'कौल दे खंडेराया', 'एकटा जीव सदाशिव', 'अष्टविनायक', 'जोतिबाचा नवस', 'भिंगरी', 'धुमधडाका', 'इरसाल कार्टी' या आणि अशा अनेक चित्रपटांतून त्यांचा अभिनय पाहण्याची प्रेक्षकांना मिळाली होती. 


 


महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागासह इतरही अनेक पुरस्कारांना गौरवण्यात आलेल्या सरोज सुखटणकर 'अमृतवेल' आणि 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकांतूनही झळकल्या होत्या. अलका कुबल यांच्यासोबतचा 'धनगरवाडा' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.