मुंबई : 'किंग खान 'म्हणून हिंदी चित्रपट वर्तुळ आणि चाहत्यांमध्ये प्रसिद्धीझोतात असणाऱ्या अभिनेता शाहरुख खानने नेहमीच त्याच्या जवळच्या व्यक्तींना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची लहानमोठी कृती ही एखाद्याच्या चेहऱ्यावर असा काही आनंद आणून जाते जे शब्दांत व्यक्त करणं निव्वळ अशक्यच. शाहरुखचा हाच अंदाज किंबहुना त्याची अशीच एक कृती पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात, त्याच्या दैनंदिन वेळापत्रकात अशी काही माणसं असतात जी त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात. शाहरुखलाही अशाच काहीजणांचं सहकार्य लाभतं. ज्यात त्याच्या रंगभूषाकार अर्थात मेकअप आर्टीस्टचाही समावेश आहे. याच मेकअप आर्टीस्टच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने 'किंग खान'ने चक्क त्याच्या लग्नमंडपात हजेरी लावली. 


'टाईम्स नाऊ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आणि सोशल मीडियावर काही फॅन पेजवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंनुसार शाहरुख या लग्नसोहळ्यात आला तेव्हा त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. तो, आला.... त्याने पाहिलं आणि त्याने नवविवाहितांना शुभेच्छा दिल्या...., असं दृश्य त्यावेळी लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी पाहिलं. 



मुख्य म्हणजे त्याचं येणं हे पाहुणे मंडळींसाठी अनपेक्षित होतं. त्यामुळे अनेकांचा या घटनेवर विश्वासच बसत नव्हता. शाहरुख आल्याची घोषणा करण्यात आली तेव्हा सारेच व्यासपीठापाशी गर्दी करु लागले, किंग खानला पाहण्यासाठी, त्याची भेट घेण्यासाठी, त्याची एक झलक टीपण्यासाठी आणि एक आठवण साठवण्यासाठीच उपस्थितांची धडपड सुरू होती. थोडक्यात काय, तर तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा शाहरुख त्याच्या जवळच्या व्यक्तींच्याही मनाची आणि भावनांची काळजी घेतो हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.