VIDEO : रणवीरचे `ते` शब्द ऐकून दीपिकाच्या डोळ्यांत पाणी
काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली.
मुंबई : सेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत सर्वांच्या आवडीचं आणि हल्ली तर आदर्शस्थानी असणारं एक जोडपं, किंवा ती एक जोडी कोणती असा प्रश्न विचारला असता एकच नाव ऐकू येतं. ते नाव म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली.
लग्नसोहळ्याचा थाट आणि बऱ्याच दिवसांच्या सुट्टीनंतर या दोघांनीही पुन्हा एकदा कामाकडे मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळालं. कामाप्रती एकनिष्ठ असणाऱ्या या जोडीला वर्षअखेरस एक आनंदाची बातमी मिळाली. ती बातमी म्हणजे रणवीरला मिळालेला पुरस्कार.
'पद्मावत' या चित्रपटात साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी त्याला स्टार स्क्रीन आवॉर्ड्सतर्फे यंदाचा सर्वत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारतेवेळी रणवीरने आपल्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दिग्दर्शक आणि मार्गदर्शक संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले. त्यासोबतच त्याने कार्यक्रमात उपस्थित आपली पत्नी, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचेही आभार मानले.
'चित्रपटात मला राणी मिळो अथवा न मिळो, पण खऱ्या आयुष्यात मात्र मला राणी मिळाली आहे', असं म्हणत त्याने दीपिकाच्या दिशेने इशारा केला. 'गेल्या सहा वर्षांमध्ये माझ्या वाट्याला जे काही यश आलं आहे त्यामध्ये माला सतत समंजस ठेवत, केंद्रस्थानी ठेवत सहकार्य केल्याबद्दल मी तुझा आभारी आहे', या शब्दांत त्याने दीपिकाप्रती आपलं आदरयुक्त प्रेम व्यक्त केलं. आई, वडील आणि बहिणीचेही त्याने न विसरता आभार मानले.
मुख्य म्हणजे रणवीरचे हे शब्द ऐकून प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दीपिकालाही तिचा आनंद सावरता आला नाही. अखेर आनंदाश्रूंच्या रुपात हा आनंद तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. खुद्द रणवीरनेच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दीपिकाचा पुरस्कार सोहळ्यातील एक फोटो पोस्ट करत त्यावर Proud Wifey असं लिहिलं होतं.
फक्त रुपेरी पडद्यापुरताच नव्हे तर, खऱ्या आयुष्यातही यशापयशाच्या प्रत्येक वळणार 'दीप-वीर' गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांची साथ देत आहेत. त्यांचा हाच अंदाज खऱ्या अर्थाने प्रेमी युगूलांना #coupleGoals देत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.