मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाच्या दमावर गायिका आणि परफॉर्मर म्हणून आपली नवी ओळख प्रस्थापित करण्यात आज नेहा कक्कड यशस्वी ठरलीय. नेहा पहिल्यांदा प्रकाशझोतात आली ती एका रिऍलिटी शोमधून... दमदार आवाज आणि परफॉर्मन्समधून नेहानं या कार्यक्रमात 'हम भी कुछ कम नही' हे छातीठोकपणे दाखवून दिलं होतं. परंतु, याच कार्यक्रमात नेहाला मागे टाकत एक गायक पुढे निघून गेला होता... आणि तोच या कार्यक्रमाचा विजेताही ठरला होता... तो गायक म्हणजे दिवंगत गायक संदीप आचार्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'इंडियन आयडॉल भाग २'चा विजेता संदीप आचार्य आज या जगात नाही... राजस्थानच्या बिकानेरचा रहिवासी असलेल्या संदीपनं २००६ साली वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी 'इंडियन आयडॉल'चा खिताब आपल्या नावावर केला होता. वयाच्या २९ व्या वर्षी तो हे जग सोडून गेला.



२००४ साली संदीप 'गोल्डन व्हॉईस ऑफ राजस्थान'चा रनर अप ठरला होता. तसंच अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये 'बेस्ट न्यू बॉलिवूड टॅलेंट'चा अवॉर्डही त्यानं आपल्या नावावर केला. तो चार भावंडांमधला सर्वात लहान भाऊ होता. २०१२ मध्ये त्यानं नम्रता आचार्य हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. परंतु, १५ डिसेंबर २०१३ रोजी काविळीत दीर्घकाळ आजारानं त्याचं निधन झालं. निधनापूर्वी केवळ २० दिवस अगोदर तो एका मुलीचा पिता बनला होता.