मुंबई : व्हिडिओ पार्लर या सिनेमामची पुणे आंतरराष्ट्री चित्रपट महोत्सवासाठी निवड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रंगा पतंगा' या पहिल्याच चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेले दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांचा पुढचा चित्रपट 'व्हिडिओ पार्लर' पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (पिफ) निवडला गेला आहे. पिफमधील मराठी सिनेमा टुडे या विभागात हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियात प्रदर्शित करण्यात आला आहे. 


हृदया सिनेक्राफ्टचे डॉ. श्रीयांश कपाले  आणि ओम्स आर्ट्सच्या डॉ. संतोष पोटे यांनी ब्लिंग मोशन पिक्चर्सचे सागर वंजारी यांच्या सहकार्याने 'व्हिडिओ पार्लर' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता संदीप पाठक, ओंकार गोवर्धन, कल्याणी मुळे, गौरी कोंगे, पार्थ भालेराव, रितेश तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन प्रसाद नामजोशी यांनी केलं आहे. सागर वंजारी यांनी संकलन, विजय नारायण गवंडे यांनी संगीत, पीयुष शहा यांनी साऊंड डिझाईन, देवेंद्र गोलतकर यांनी सिनेमॅटोग्राफी, नीलेश गोरक्षे यांनी कला दिग्दर्शन, श्रीकांत देसाई यांनी रंगभूषा केली आहे.


चित्रपट करण्यासाठी विषय शोधत दिग्दर्शक असलेला विक्रम त्याच्या मूळ गावी जातो. तिथं गेल्यानंतर त्याला त्याच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. व्हिडिओ पार्लरमध्ये तो ज्याच्याबरोबर चित्रपट पहायचा, त्या बालमित्रालाला वीस वर्षांमध्ये भेटलेला नाही. त्याचं यशापयश, प्रेम, अपमान, मित्राचं आयुष्य या सगळ्यातून त्याला मिळालेला चित्रपटासाठी विषय असं या चित्रपटाचं कथासूत्र आहे.



व्हिडिओ पार्लरविषयी दिग्दर्शक प्रसाद नामजोशी म्हणाले, 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवात आमच्या चित्रपटाची निवड होणं आनंददायी आहे. या निमित्ताने चित्रपट जाणकार प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटतो, याची उत्सुकता आहे. चित्रपट लवकरच प्रदर्शितही होईल.'