कोल्हापूर : कोल्हापूरात पावसाचा धूमाकूळ सुरु आहे. मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूरातील अनेक भागात बसला आहे. कोल्हापुरात आलेल्या पुरामुळे 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या शूटिंगच्या ठिकाणीही पाणी साचलं आहे. मालिकेतील कलाकार पुराच्या पाण्यात अडकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शूटिंगच्या ठिकाणी पाणी आल्याने राणादा-पाठकबाईंसह कलाकारांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. मुसळधार पावसाने कोल्हापूरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरातील वसगडे गावात कलाकार असून या गावातील अनेक घरांना पाण्याने वेढा घातला आहे. 


मुसळधार पाऊस आणि पंचगंगेची वाढत असलेली पाणी पातळी यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट आहे. सध्या नदी ५४ फूट १० इंचावरून वाहते आहे. पंचगंगेनं रौद्ररूप धारण केलं आहे. 


जिल्हा प्रशासनाच्या मागणीनंतर एनडीआरएफसह लष्कराची पथके कोल्हापूरात दाखल झाली.


कोल्हापुरात पंचगंगेला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर देखील ६ फुटांहून अधिक पाणी आहे. त्यामुळे पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.