महिलादिनी विद्याची भावनिक पोस्ट
स्वत:वर प्रेम करायला शिका
मुंबई : आज जागतिक महिला दिवस साजरा केला जात आहे. देशभारातून महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. सोशल मीडियावरून महिला जागरूकतेविषयी मोहिम सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालननेही महिलादिनाविषयी एक पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे. विद्याने स्वत:सह सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्याने या पोस्टमधून स्वत:वर प्रेम करा असं म्हटलंय. आधी कधीही तुम्ही असं केलं नसेल तर आजपासून स्वत:वर प्रेम करायला सुरूवात करा. तुमच्या शरिरावर, मनावर प्रेम करा. तुम्ही जसे आहात तसे स्वत:ला स्वीकारा. बारिक, जाड, श्रीमंत, कूल, गोरं, यशस्वी होण्याची वाट पाहू नका. जर तुमचं स्वत:वर प्रेम असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. जे तुम्हाला जाणून न घेता तुमच्याबद्दल मतं बनवत असतील, त्यांची मते मांडली गेल्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत असेल तर अशा लोकांचा विचार करणं सोडून द्या.
दुसऱ्यांसोबत स्वत:ची तुलना करू नका. प्रत्येक गोष्टीत मला सर्वोत्तम व्हायचे आहे हा विचार करू नका. तुम्ही जसे आहात तसेच सर्वोत्तम आहात. पुन्हा दुसरा दिवस आहे. त्यावेळी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करा पण कोणाशीही तुलना करू नका. दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वत:वर विश्वास ठेवा. आजपासून स्वत:वर प्रेम करा. केवळ आजच नाही तर दररोज स्वत:वर प्रेम करायला शिका. आजचा दिवस जगायला शिका आणि तुमचा आत्मविश्वासही कायम ठेवा. अशी पोस्ट करत विद्या बालनने महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महिलादिनाविषयी भावनिक पोस्ट शेअर करत @glowinggoddessgetaway ने शेअर केलेल्या या फोटोने मला ही पोस्ट लिहिण्याची प्रेरणा मिळाली असल्याचं विद्यानं सांगितलं.