प्रेमात ठेच लागल्यानंतर अखेर `ती` अभिनेत्री सावरली; आज आयुष्यभरासाठी खास माणसाची जोडीदार झाली
आज मात्र तिला अखेर खरं प्रेम मिळालंच.
मुंबई : प्रेम करताना एखादी व्यक्ती इतकी बेभान होऊन जाते, की त्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टींची शुद्ध राहत नाही. समाज, परिस्थिती किंबहुना अडचणीही प्रेमात पडलेल्यांना लहान वाटू लागतात. हे प्रेमच असतं, जे त्यांना इतकं बळ देत असतं. इतका आत्मविश्वास देत असतं.
प्रेमाचं हे नातं मुळात असं आहे, जिथे एका व्यक्तीच्या नव्हे तर दोन्ही व्यक्तींच्या लहानसहान प्रयत्नांनी ते मोठं होत असतं. अशा या नात्यात जेव्हा ठेच लागते तेव्हा मात्र परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. (Vignesh Shivan wife Nayanthara Video prabhudeva relationship)
कोलमडलेल्यांना अशा परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठीही तितकाच वेळ लागतो. एका अतिशय गाजलेल्या अभिनेत्रीला तिच्या प्रेमाच्या नात्यात अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. पण, आज मात्र चित्र वेगळं आहे.
कारण, ज्याच्यासाठी धर्म सोडला, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानं मात्र या अभिनेत्रीची साथ सोडली. नात्यात दुरावा आल्यामुळं त्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. सेलिब्रिटीच्या लग्नात या अभिनेत्रीमुळ वादळ आल्यामुळं तिला समाजानंही टोमणे मारले. ज्याच्यासाठी तिनं सर्व सहन केलं, त्यानं मात्र तिची साथ मध्येच सोडली.
आज मात्र याच अभिनेत्रीला तिचा आयुष्यभराचा जोडीदार मिळाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे नयनतारा. नुकतंच नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन यांचा विवाहसोहळा पार पडला. शाहरुख खान, बोनी कपूर आणि इतरही बड्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत नयनतारानं विग्नेशशी लग्नगाठ बांधली.
सर्व स्तरांतून या जोडीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यातच अनेकांनी तिच्या आयुष्यात आलेल्या या सुखद वळणाबद्दल आनंदही व्यक्त केला आहे.
नयनताराचा भूतकाळ...
नयनतारा जेव्हा प्रभुदेवाच्या प्रेमात वेडी झाली होती. तिला त्यांचा लग्नाची स्वप्नही पडू लागली होती. एवढंच नाही तर प्रभुदेवाशी लग्न करण्यासाठी तिने ख्रिश्चन धर्मही सोडला होता. तिनं आर्य समाज मंदिरात हिंदू धर्म स्वीकारला होता.
प्रभुदेवा मात्र तेव्हा विवाहित होता. 2008 मध्ये नयनताराने प्रभुदेवाला डेट करायला सुरुवात केली होती. नयनतारा आणि प्रभुदेवामध्ये सुरू असलेल्या या बातम्या आता त्याच्या घरापर्यंत पोहोचू लागल्या. पाहता पाहता हे वाद विकोपास जाऊ लागले.
प्रभुदेवाची पत्नी रामलता हिनेही आपला पती नयनतारासोबत लिव्हनमध्ये राहत असल्याचा अर्ज न्यायालयात केला होता. त्यानंतर प्रभुदेवाने पत्नी रामलतासोबतचे सगळे संबंध तोडून वेगळा होण्याचा निर्णय घेतला.
पण, पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर पुढच्याच वर्षी नयनतारानेही जाहीर केलं की, तिने प्रभुदेवासोबतचे सगळे संबंध तोडले आहेत. या नात्यात ठिणगी पजडली आणि दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या.