साऊथ अभिनेता विजय बाबूला अटक; ३ जुलैपर्यंत होणार चौकशी
मल्याळम अभिनेता विजय बाबू हा साऊथमधील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहे.
मुंबई : मल्याळम अभिनेता विजय बाबू हा साऊथमधील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहे. अभिनयासोबतच तो चित्रपट निर्मितीतही सक्रिय आहे. एप्रिलमध्ये एका महिलेने त्याच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केल्याने हा अभिनेता खूप चर्चेत आला होता. मात्र, आता या प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्याला अटक केल्याची बातमी समोर येत आहे.
महिलेने विजय बाबूवर लैंगिक छळ आणि बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर एर्नाकुलम दक्षिण पोलिसात अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. यानंतर विजय बाबू दुबईला पळून गेला आणि तेथून या महिन्यात परत आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
३ जुलैपर्यंत चौकशी होणार आहे
या प्रकरणी विजय बाबू एर्नाकुलम पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याचबरोबर, जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, या प्रकरणासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे, जी लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात 3 जुलैपर्यंत अभिनेत्याची चौकशी करेल.
विजय बाबूने स्वत:ला निर्दोष सांगितलं होतं
जेव्हा महिलेने विजय बाबूवर गंभीर आरोप केले तेव्हा अभिनेत्याने या प्रकरणाबद्दल सांगितलं होतं की तो निर्दोष आहेत आणि त्याबद्दल त्या महिलेवर मानहानीचा खटला दाखल करणार आहे. मात्र, तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. आता या प्रकरणाबाबत आणखी काही समोर येतंय का हे पाहावं लागेल.