`दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देवांचा अपमान, मग बॉयकॉट का नाही?` ट्रोलर्सच्या निशाण्यावर Vijay Devarakonda
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर #boycottbollywood हा ट्रेंड सुरु आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटांचे खूप कौतुक केले जात आहे. तिथल्या कलाकारांची स्तुती करताना लोक थकत नाहीत. त्यांचे पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर चाहते शेअर करताना दिसतात. मग तो ऑनस्क्रीन असो वा ऑफस्क्रीन. पण आता दाक्षिणात्य चित्रपटांच्या सीनवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या 'द्वारका' चित्रपटातील आहे. या व्हिडीओत देवाचा अपमान झाल्याचा दावा करत काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. दाक्षिणात्य कलाकारही धार्मिक भावना दुखावत असतील तर त्यांच्यावर बहिष्कार का टाकला जात नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओत विजय मंदिरातून श्रीकृष्णाची मूर्ती चोरताना दिसत आहे. तेव्हाच मंदिरात उपस्थित असलेले लोक जागे होतात आणि विजय पकडला जातो. यावेळी स्वत: ची सुटका करत धावत असलेला विजय एका मुलीशी धडकतो आणि तिला पाहून तो सर्व काही विसरून जातो. पुढे विजयच्या एका हातात देवाची मूर्ती असते तर दुसरीकडे तो त्या मुलीला स्वत: कडे ओढून घेतो आणि आणि जबरदस्तीनं लिप-लॉक करतो.
हा व्हिडिओ शेअर करत एक नेटकरी म्हणाला,'धार्मिक भावना दुखावणाऱ्या चित्रपटांवर बहिष्कार का घालू नये? द्वारका चित्रपटातील विजय देवरकोंडाचं लाजिरवाणं दृश्य, ज्यामध्ये तो कृष्णाची मूर्ती हातात धरून एका मुलीला जबरदस्तीने किस करतो.' दुसरा नेटकरी, म्हणाला 'म्हणून हा चित्रपट फ्लॉप झाला.'
विजयचा नुकताच प्रदर्शित झालेला 'लाइगर' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. सोशल मीडियावर #BoycottLiger ट्रेंड करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांनी विजय आणि अनन्या पांडेला अभिनय चांगला नसल्याचे म्हटले आहे.