`घरी जाण्याची वेळ...` म्हणत यशशिखरावर असतानाच विक्रांत मेस्सीचा अभिनय क्षेत्राला रामराम
Vikrant Massey Announces Retirement: विक्रांत मेस्सी याने अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने पोस्ट करत हा निर्णय जाहिर केला आहे.
Vikrant Massey Announces Retirement: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी यांने एक मोठी घोषणा केली आहे. विक्रांतने इन्स्टाग्राम पोस्ट करत तो अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या या निर्णयाने असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारकिर्दीच्या शिखरावर असताना विक्रांतने हा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 1 डिसेंबर रोजी त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
विक्रांत मेस्सी याने आत्तापर्यंत अनेक उत्तम कलाकृतींमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अनेक चित्रपटातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुकही करण्यात आले होते. 1 डिसेंबर रोजी विक्रांतने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नमस्कार, गेले काही वर्ष आणि येणारे वर्ष खूप चांगले जाणार आहेत. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. मात्र, मी जसा जसा पुढे जातोय तशी मला जाणीव होतेय की आता रिकेलिब्रेट करण्याचा आणि घरी जाण्याची वेळ आली आहे. एक पति, पिता आणि मुलाच्या रुपाने आणि एक अभिनेता म्हणूनही, असं विक्रांतने म्हटलं आहे.
येणाऱ्या 2025 या वर्षात आपण शेवटचे एकमेकांना भेटणार आहोत. जोपर्यंत योग्य वेळ येत नाही. मागील दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणींसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. या दरम्यान प्रत्येक गोष्टीसाठी मी सदैव ऋणी आहे, असं विक्रांतने म्हटलं आहे.
अलीकडेच विक्रांतने द साबरमती रिपोर्टच्या प्रमोशनदरम्यान त्याला सतावणाऱ्या चिंतेबद्दल जाहीरपणे बोलला होता. त्याचा 9 महिन्याचा मुलगा वर्धनच्या सुरक्षेसंदर्भात त्याने चिंता व्यक्त केली होती. साबरमती रिपोर्ट हा 2002च्या गोध्रा ट्रेन अग्निकांडवर आधारित आहे. ज्यामुळं हा चित्रपट वादात सापडला होता. विक्रांतने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर त्याला धमक्या मिळत होता. इतकंच नव्हे तर त्याच्या नवजात मुलावरही निशाणा साधला होता.
विक्रांतने म्हटलं होतं की, मला धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावरुनही मला धमक्या येत आहे. या लोकांना माहितीये की मी 9 महिन्यांपूर्वीच वडील झालो आहे. माझ्या मुलाला अजून चालताही येत नाही त्याचे नाव यासगळ्यात घेण्यात येत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी मला चिंता वाटत आहे. आपण कोणत्या समाजात वावरत आहोत? भीती वाटत नाही तर वाईट वाटतंय, असं विक्रांत मेस्सी याने म्हटलं होतं.