प्रियांकाने अशी साजरा केली लग्नानंतरची पहिली दिवाळी
यंदाची दिवाळी प्रियांकासाठी अतिशय खास होती
मुंबई : सध्याच्या घडीला सर्वजण सहकुटुंब सहपरिवार दिवाळीच्या सणाचा आनंद घेत आहेत. यात कलाकारही मागे राहिलेले नाहीत. सोशल मीडियावर यासंदर्भातील बरेच फोटो व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. यात 'देसी गर्ल' प्रियांकानेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
पती, अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत प्रियांकाने चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रियांकाचा मित्रपरिवारही दिसत असून, तिच्या घराची सुरेख रोषणाईसुद्धा अनेकांचं मन जिंकून गेली.
लग्नानंतर परदेशात स्थिरावलेल्या प्रियांकाने आपली संस्कृती जपत कायमच सण- उत्सव अगदी भारतीय पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला आहे. याचा प्रत्यय यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानेही आला. यंदाची दिवाळी प्रियांकासाठी अतिशय खास होती, कारण लग्नानंतरची ही तिची पहिलीच दिवाळी. गेल्या वर्षी निकसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर प्रियांकाने कलाविश्वातील तिच्या कामांवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच खासगी आयुष्यावरही भर दिल्याचं पाहायला मिळालं.
काही दिवसांपूर्वीत प्रियांका 'द स्काय इज पिंक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळालेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी मात्र चांगली दाद दिली होती. या चित्रपटात प्रियांकाच्या अभिनयाचीही विशेष प्रशंसा झाली.