Video: थाटात मुंबई एअरपोर्टवर प्रवेश करणाऱ्या शाहरुखला सुरक्षा कर्मचाऱ्याने अडवलं अन्..
Video Shah Rukh Khan Stopped At Mumbai Airport: शाहरुख खानचा हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील असून सध्या तो चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Video Shah Rukh Khan Stopped At Mumbai Airport: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानला कोण ओळखत नाही? अनेक देशांमध्ये जिथे भारताबद्दल फारशी माहिती नाही तिथेही शाहरुख प्रसिद्ध आहे. असं असतानाच मुंबई विमानतळावर घडलेला एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. मागील आठवड्यांमध्ये मुंबई विमानतळावरुन उड्डाण भरण्यासाठी आलेल्या शाहरुख खानला विमानतळाच्या प्रवेशद्वारावर एका सुरक्षा कर्मचाऱ्याने अडवलं. नियमीतपणे ज्या पद्धतीने इतर प्रवाशांचा चेहरा पाहून शहानिशा केली जाते तोच नियम शाहरुखसाठी असल्याचं या कर्मचाऱ्याने त्याच्या कृतीमधून दाखवून दिलं.
शाहरुखची झळक मिळवण्यासाठी धडपड
झालं असं की, शाहरुख नेहमीप्रमाणे मुंबई विमानतळावर व्हीआयपी गेटसमोर आला. त्यानंतर आपल्या आलीशान गाडीमधून खाली उतरुन शाहरुख विमानतळामध्ये प्रवेश घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचला. दरम्यान शाहरुखच्या मागे पुढे पापाराझींची धावपळ सुरु झाली. शाहरुखची एक झलक कॅमेरात टीपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. संपूर्ण काळ्या कपड्यांमधील लूकमध्ये असलेल्या शाहरुखने कार्गोसारखी काळी पॅण्ट, काळं टीशर्ट, काळं जॅकेट घातलं होतं.
बॉडीगार्डही हसू लागला
शाहरुख प्रवेशद्वाराजवळ आला असता त्याच्या मॅनेजरने सुरक्षा कर्मचाऱ्याच्या हातात तिकीट दिलं. तर शाहरुख पासपोर्ट पकडून उभा होता. पासपोर्टवरील नाव आणि तिकीटवरील नाव सुरक्षा कर्मचाऱ्याने पडताळून पाहिलं. त्यानंतर पासपोर्टवरील फोटो आणि समोर उभा असलेला शाहरुखचा चेहरा सारखा आहे की नाही हे सुद्धा सुरक्षा रक्षकाने नजरेच्या कोन्यातून तपासून पाहिलं. हा सारा प्रकार पाहून शाहरुखच्या बॉडीगार्डलाही हसू अनावर झालं. शाहरुखही हसत हसत आपला पासपोर्ट दोन्ही हातांनी पकडून सुरक्षा कर्मचाऱ्याकडून पडताळणी पूर्ण होईपर्यंत उभा होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्यात.
अनेकांनी केलं कौतुक
शाहरुखच्या चाहत्यांनी तो ज्या पद्धतीने व्यक्त झाला ते पाहून त्याचं कौतुक केलं आहे. शाहरुखने सुरक्षा कर्मचाऱ्याला दिलेली स्माइल फारच बोलकी होती असं अनेकजण म्हणालेत. तर बऱ्याच लोकांनी समोर शाहरुख असूनही आपलं काम चोखपणे करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. "समोर अगदी देवही आला तरी आपल्या कामाशी आणि कर्तव्याशी इमान राखणाऱ्या या सुरक्षा अधिकाऱ्याला सलाम", असं एकाने कमेंट करुन म्हटलं आहे. अन्य एकाने शाहरुख खान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यामधील हा अबोल संवाद फारच सुंदर असल्याचं म्हणत दोघेही आपआपलं काम अगदी उत्तमप्रकारे करत होते, असं म्हटलं आहे.
शाहरुख खानचा डंकी चित्रपट या महिन्यामध्ये प्रदर्शित होत आहे. जवान आणि पठाणच्या यशानंतर शाहरुखचा यंदाच्या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. हा चित्रपट राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कामालीची उत्सुकता आहे.