स्त्री कलाकारांकडे `नाही` म्हणण्याचं धाडस हवं - रोहिणी हट्टंगडी
जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान
रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : जेष्ठ अभिनेत्री आणि नाटककार रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मराठी नाट्यसृष्टीत विष्णुदास भावे पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते हट्टंगडी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ५ नोव्हेंबर म्हणजेच रंगभूमी दिनाचे औचित्य साधत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'कलाकरांनी स्वतःवर बंधन घातलीच पाहिजे. खास करून स्त्री कलाकारांकडे काही गोष्टींना नकार देण्याचं धाडस असायला हवं, शोषणाला नाही म्हणायला शिकलचं पाहिजे, एकदा नाही म्हणा, परत कोण हिंमत करणार नाही. कलाकार म्हणून जितकं चांगलं असावं तितकंच माणूस म्हणूनही चांगलं असणं गरजेचं आहे.' असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गेल्या ५४ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
यापूर्वी हा पुरस्कार बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, विठाबाई नारायणगावकर, प्रभाकर पणशीकर, वसंत कानेटकर, विक्रम गोखले आदींसह अन्य मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.