बॉलिवूड सोडून व्यवसायात का गुंतलास? विवेक ओबेरॉयने केला खुलासा, `बॉलिवूडमधील लॉबी माझ्या...`
चित्रपट हिट झाल्यानंतरही मी 14 ते 15 महिने घरी बसून होतो असा खुलासा विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) केला आहे.
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने कंपनी, रोड, साथिया, युवा अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र हिट चित्रपट देऊनही त्याला बॉलिवूडच्या राजकारणाचा मोठा फटका बसला. यामुळेच त्याने अभिनयासह पर्याय म्हणून व्यावसायात गुंतण्यास सुरुवात केली. स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने आपल्या काम मिळत नसलेल्या टप्प्याबद्दल सांगितलं आहे. 'शूटआऊट अॅट लोखंडवाला' चित्रपटातील गणपत गाणं व्हायरल झाल्यानंतरही 14 ते 15 महिने मी घऱी बसून होतो अशी खंत विवेक ओबेरॉयने व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील लॉबी कल्चरचा आपलल्या करिअरला मोठा फटका बसल्याचं विवेक ओबेरॉयने सांगितलं आहे.
"मी 22 वर्षात जवळपास 67 प्रोजेक्ट केले आहेत. पण इंडस्ट्री ही खूप असुरक्षित जागा आहे. तुम्ही चांगल काम करु शकता, पुरस्कार जिंकू शकता आणि एक अभिनेता म्हणून तुमचे काम करू शकता. परंतु त्याच वेळी, इतर कारणांमुळे तुम्हाला काम मिळू शकत नाही. 2007 नंतर जेव्हा मी शूटआउट ॲट लोखंडवाला चित्रपट केला तेवल्हा 'गणपत' गाणं व्हायरल झालं होतं. त्यामुळे मला खूप ऑफर्सची अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. चित्रपटाच्या यशानंतर मी 14 ते 15 महिने घरी बसलेलो होतो," असं विवेक ओबेरॉयने म्हटलं आहे.
"2009 च्या आसपास मी ठरवलं की मला यावर पूर्णपणे अवलंबून राहायचे नाही. मला माझं आर्थिक स्वातंत्र्य तयार करायचं आहे. मला अशा परिस्थितीत राहायचं नव्हतं की लॉबी तुमचे भविष्य ठरवेल. गोष्टींवर नियंत्रण असल्याने कोणीतरी तुम्हाला धमकावू शकते,” असं विवेक म्हणाला.
विवेक ओबेरॉयने धैर्य दाखवत व्यावसायात पाय ठेवला. खरं तर हा त्याला प्लॅन बी होता. पण यामुळे त्याला अनेक खडतर आव्हानांचा सामना करण्याची आणि आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याची संधी मिळाली. "व्यावसाय हा नेहमीच माझा प्लॅन बी होता. पण मी ठरवलं होतं की, सिनेमा माझं पॅशन आहे. माझा उदरनिर्वाहाचा पर्याय व्यवसाय होता ज्याने मला मदत केली स्वातंत्र्य मिळवून देण्यास आणि लॉबीच्या त्या सापळ्यातून बाहेर पडण्यास किंवा आत्मा विकण्यापासून किंवा एखाद्याला शोषून घ्यावे लागेल जे किमान माझ्यासाठी जगण्याचा उत्तम मार्ग नाही. काही लोक त्यातून उदरनिर्वाह करतात पण माझ्यासाठी असे नाही,” असं अभिनेत्याने सांगितलं.
विवेकने पहिल्यांदाच यावर भाष्य केलेलं नाही. सार्वजनिक अपमान, ऑनलाइन ट्रोलिंग झाल्याच्या आठवणींना उजाळा देत त्याने एंटरटेनमेंट लाईव्हला सांगितलं होतं की, "माझ्या बाबतीत, तीव्रता जबरदस्त होती. मला ट्रोलिंग, सार्वजनिक अपमान आणि व्यावसायिक शत्रुत्वाचा सामना करावा लागला. मी साइन केल्यानंतर माझ्याकडून प्रकल्प हिसकावून घेण्यात आले. मला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्या, पोलिसांना मला एक सशस्त्र गार्ड आणि बंदूक द्यावी लागली," असं त्याने सांगितलं होतं.
विवेक ओबेरॉयने 2010 मध्ये प्रियंकासोबत लग्न केलं. ती कर्नाटकचे माजी मंत्री दिवंगत जीवराज अल्वा आणि प्रसिद्ध नृत्यांगना नंदिनी यांची मुलगी आहे. विवान वीर आणि अमेय निर्वाण अशी दोन मुलं त्यांना आहेत.