टीम इंडियाच्या पराभवानंतर विवेकचं वादग्रस्त मीम; नेटकऱ्यांनी झोडपलं
भारताच्या पराभवानंतर केलेल्या ट्विटवर विवेक ट्रोल
मुंबई : सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारा बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय पुन्हा एकदा अशाच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. वर्ल्ड कप २०१९ च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. भारताच्या पराभवानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. मात्र विवेक ओबेरॉयने क्रिकेट चाहत्यांबद्दल वादग्रस्त पोस्ट केली, ज्यामुळे विवेकला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
सेमीफायनलमध्ये भारतीय संघाच्या पराभवानंतर विवेकने त्याच्या ट्विटर अकाउंटवर क्रिकेट चाहत्यांसाठी एक GIF पोस्ट शेअर केली. या GIF मध्ये एक व्यक्ती रस्त्यावर चालत असताना विचार करतो की, एक महिला त्याच्याजवळ येत आहे, त्याला मिठी मारणार आहे परंतु, ती महिला त्याच्याकडे न जाता त्या व्यक्तीच्या मागे असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला मिठी मारते.
विवेकने, 'विश्वचषक २०१९ सेमीफायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय चाहत्यांची स्थिती या व्यक्तीसारखी झाली' असं म्हणत त्याने पोस्ट शेअर केली. विवेकची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरली नाही. या पोस्टनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विवेकला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
विवेकने शेअर केलेल्या या मीमवर चाहत्यांनी त्याला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. चाहत्यांनी विवेकला हा आपल्या भारतीय संघाचा अपमान असल्याचं म्हणत त्याच्यावर टीका केली आहे.
याआधीही विवेकने निवडणुकीदरम्यान ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा फोटो असलेला, एक्झिट पोलबाबत अशाच प्रकारचं मीम शेअर केलं होतं. त्यावरही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं होतं.