मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय संगीत दिग्दर्शक वाजिद खान यांच किडनीमधील संसर्ग बळावल्यामुळं निधन झालं. वाजिद खान यांना किडनीच्या संसर्गासोबतच कोरोनाची लागण झाल्याचंही म्हटलं जात आहे. अशा चर्चा असल्या तरीही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमधील कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियार शोक व्यक्त केला आहे. वाजिद खान यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हॉस्पिटलमध्ये वाजिद खान यांनी बेडवर बसून 'दबंग ३' सिनेमातील 'हु़ड हुड दबंग दबंग' हे गाणं गायलं आहे. 


या व्हिडिओत वाजिद खान म्हणतात की,'साजिद भाईकरता मी तर एकच गाणं गाणार.' यानंतर त्यांनी सलमान खानच्या सिनेमातील लोकप्रिय गाणं 'हुड दबंग दबंग' हे गाणं गायलं आहे. वाजिद खान हॉस्पिटलच्या बेडवर बसून गाणं गात आहेत. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे स्पष्ट झालेलं नाही. मात्र वाजिद खान यांच्या निधनानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 


संगीत दिग्दर्शक सलीम मर्चंटनं ट्विटरच्या माध्यमातून वाजिद यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. 'त्यांना अनेक व्याधींनी ग्रासलं होतं. त्यांना किडनीचा आजार होता. नुकतं त्यांचं प्रत्यारोपणही झालं होतं. हल्लीच त्यांना किडनीचा संसर्ग झाल्याचंही कळलं होतं. प्रकृती खालावू लागल्यानंतर मागील चार तासांपासून त्यांच्यासाठी व्हेंटिलेटरचा वापर करण्यात आला होता. किडनीच्या संसर्गानं सुरुवात झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली', असं सलीमने पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितलं.