मुंबई : सोमवारी प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं निधन झालं. त्याच्या अशा अचानक निघून जाण्यामुळे संपूर्ण  कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. किडनीमधील संसर्ग बळावल्यामुळं आणि कोरोना व्हायरसमुळं त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्या आई रझीना खान यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमची सहयोगी वेबसाईट बॉलिवूड लाईफने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जेव्हा वाजिद खान रुग्णालयात उपचार घेत होते तेव्हा त्यांच्या सोबत त्यांची आई होती. सध्या रझीना खान यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु त्यांना अद्यापही मुलाच्या मृत्यूची बातमी देण्यात आलेली नाही. 


वाजिद यांचं जाणं अनेकांना धक्का देणारं ठरत आहे. अगदी अनपेक्षितपणे त्यांची ही एक्झिट पाहता, यापुढं साजिद- वाजिद या जोडीची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार नाही. साजिद-  वाजिद आणि सलमान खानचे चित्रपट हे प्रेक्षकांसाठीचं अफलातून समीकरण यापुढे मात्र काहीसं अपूर्णच राहिल. या लोकप्रिय संगीतकार जोडीनं आतापर्यंत 'वॉण्टेड', 'दबंग', 'एक था टायगर' अशा चित्रपटांना संगीत दिलं होतं.


गेल्या दोन महिन्यांमध्ये  बॉलिवूडला बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. सर्व प्रथम २९ एप्रिल रोजी अभिनेते इरफान खान यांनी या जगाचा निरोप घेतला. या घटनेला २४ तास उलटत नाही तर दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली. तर जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिग्गज संगीतकार वाजिद खान यांनी अखेरचा श्वास घेतला