लॉकडाऊनमध्येही हृतिक- सुझानने दणक्यात साजरा केला मुलाचा वाढदिवस
पाहा त्याचेच काही खास क्षण...
मुंबई : काही दिवसांपासून देशभरातच लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सर्वत्र CORONAVIRUS कोरोना व्हायरसच्या दहशतीचं वातावरण असताना भारतात लागू झालेल्या लॉकडाऊननंतर प्रत्येकानेच घरी थांबून आपल्या कुटुंबासमवेत हा काळ व्यतीत करण्याला प्राधान्य देत आहे. सेलिब्रिटी मंडळीही यात वेगळे नाहीत. मुख्य म्हणजे लॉकडाऊन आणि क्वारंटाईनच्या या काळात नात्यांना एक वेगळीच झळाळी मिळत आहे.
नात्यांचा उल्लेख निघाल्यामुळे इथे उत्तम उदाहरण ठरत आहे, अभिनेता हृतिक रोशन याचं. क्वारंटाईनच्या या काळात कुटुंबाला प्राधान्य देत हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझानही त्यांच्यासमवेत राहण्यास आली आहे. याच दिवसांमध्ये या दोघांनी मिळून रेहान या त्यांच्या मुलाचा वाढदिवसही साजरा केला. तोसुद्धा कुटुंबीयांच्या उपस्थितीत.
खुद्द हृतिकनेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत याविषयीची माहिती दिली. ज्यामध्ये रेहानच्या वाढदिवसातील काही सुरेख क्षण चाहत्यांनाही पाहता येत आहेत. एकमेकांपासून या क्षणाला वेगळं असतानाही हृतिकच्या कुटुंबीयांनी इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या मदतीने रेहानच्या वाढदिवसाला हजेरी लावली.
राकेश आणि पिंकी रोशन, हृतिकची बहीण सुनैना रोशन, तिची मुलगी सुरानिका, पश्मिना आणि इतरही सदस्यांनी रेहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या क्षणाता सुरेख व्हिडिओ पोस्ट करत हृतिकने भविष्यात चांगले दिवस येतीलच असा विश्वास आणि आशाही व्यक्त केली.