VIDEO : लग्नांनंतर रणवीर बदलला, पण....
लग्नानंतरचे रागरुसवे असेही...
मुंबई : हिंदी कलाविश्वात रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या काही जोड्या या खऱ्या आयुष्यातही एकमेकांची साथ देताना पाहायला मिळालं आहे. अशा जोड्यांमध्ये गेल्याकाही वर्षांपासून सर्वांच्याच पसंतीस उतरणारी रिल आणि रिअल लाईफ जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंगची. 'गोलियों की रासलीला- रामलीला' या चित्रपटातून दीपिका- रणवीर पहिल्याच वेळेस प्रेक्षकांसमोर आले होते. त्या चित्रपटापासून जितकी त्यांची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली तितकीच खऱ्या आयुष्यातही ते दोघं एकमेकांना साथ देताना पाहायला मिळालं.
जवळपास पाच ते सहा वर्षांच्या नात्यानंतर २०१८ मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली आणि प्रेक्षकांमध्ये आनंदाची लाटच उसळली. रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नानंतर ते दोघंही प्रथमच एका विवाहित जोडीच्या रुपात केव्हा झळकणार याविषयीची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली. प्रेक्षकांची हीच मागणी आता पूर्ण झाली आहे. अर्थात चित्रपटाच्या माध्यमातून नव्हे, तर सध्यापुरता एका जाहिरातीच्या माध्यमातून रणवीर आणि दीपिका प्रथमच लग्नानंतर एक खऱ्या खुऱ्या आयुष्यातील जोडी म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे.
एका एसीच्या ब्रँडसाठी दीप-वीर एकत्र आले आहेत. ज्यामध्ये लग्नानंतर दीपिकासाठी रणवीर आपली भूमिका काहीशी बदलली असल्याचं म्हणत आहे. एक प्रियकर म्हणून प्रेयसीची वेळोवेळी मनधरणी करण्यासाठी, तिचं मन जिंकण्यासाठी किंवा मग तिला आनंदी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टी आता करण्याची गरज नाही, कारण आता मी तुझा पती आहे...., असं रणवीर दीपिकाला म्हणतो. पण, त्याचं हे म्हणणं दीपिकाला काही रुचत नाही. आता ते नेमकं का रुचत नाही हे जाहिरातीतच पाहाच.....
दीपिका आणि रणवीर एखाद्या चित्रपटातून झळकावेत अशी अनेक चाहत्यांची भावना आहे. किंबहुना ते लवकरच मोठ्या पडद्याव एकत्र झळकणार असल्याची चिन्हंही आहेत. सध्याच्या घडीला ते दोघंही आपआपल्या चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. दीपिका येत्या काळात मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' या जाहिरातीतून झळकणार आहे, तर रणवीर कबीर खानच्या '८३' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे.