शम्मी कपूरच्या अंदाजात दिलजीत क्रितीला म्हणतोय `मै दिवाना तेरा`
दिलजीत लवकरच `अर्जुन पटियाला` या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : पंजाबी चित्रपटसृष्टीतून नावारुपास आल्यानंतर अभिनेता दिलजीत दोसांज याने त्याचा मोर्च हिंदी कलाविश्वाकडे वळवला. अभिनय आणि दिलखुलास स्वभावाच्या बळावर त्याने पाहता पाहता बॉलिवूडमध्येही आपली जागा भक्कम केली. दिलजीत लवकरच 'अर्जुन पटियाला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच ट्रेलर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ज्या माध्यमातून दिलजित आणि क्रिती सेनन यांच्यातील केमिस्ट्री पाहता येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघंही पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत.
'मै दिवाना तेरा' असे बोल असणाऱ्या या गाण्याचा उल्लेख पार्टी साँग म्हणून केला तरीही हरकत नाही. ज्यामध्ये क्रिती आणि दिलजितचा अंदाज पाहण्याजोगा आहे. मै दिवाना तेरा असं म्हणताना शम्मी कपूर यांच्याप्रमाणे नृत्यकला सादर करणारा दिलजीत अनेकांचीच मनं जिंकून जातो. तर, पिवळ्या आणि निळ्या रंगाची रंगसंगती असणाऱ्या साडीच्या लूकमध्ये क्रितीसुद्धा त्याला शोभून दिसत आहे.
गुरु रंधावा याने गायलेल्या आणि सचिन जिगर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला प्रदर्शित होऊन काही तास उलटत नाहीत तोच सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता पाहायला मिळत आहे. गाण्यात फुकरे फेम अभिनेता वरुण शर्मा हासुद्धा झळकत आहे. कलाकारांची ही फौज आणि त्यांचा अंदाज पाहता आता ही दिवानगी प्रेक्षकांच्या मनात घर करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.