श्रीदेवीला मृत्यूनंतरही सन्मान मिळू द्या, कुटुंबीयांचं चाहत्यांना आर्जव
बॉलिवूडची `चांदणी` अनंतात विलीन झालीय. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी एक संदेश तिच्या चाहत्यांना दिलाय.
मुंबई : बॉलिवूडची 'चांदणी' अनंतात विलीन झालीय. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी एक संदेश तिच्या चाहत्यांना दिलाय.
'गेले काही दिवस सर्वांसाठी कठिण ठरलेत... आजचा दिवस सर्वात कठिण होता. एक सुंदर व्यक्ती आपल्यातून निघून गेलीय... 'माझं आयुष्य' असा ज्यांचा प्रत्येक वेळी श्रीदेवी उल्लेख करत होती अशा त्यांच्या मुलींना याघडीला सांभाळण्याची गरज आहे. त्यांना त्यांच्या आईच्या सुंदर अशा आठवणी जागवू द्या... आणि श्रीदेवी यांनी आपल्या मुलींसाठी जी स्वप्न पाहिली होती, तसंच त्यांना आयुष्य मिळू द्या...' असं म्हणत श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांनी तिच्या चाहत्यांना शांततेची साद घातलीय.
'आमच्या खाजगी जीवनाचा आदर राखून आम्हाला आमचं दु:ख व्यक्त करू द्या... श्रीदेवी यांनी आपलं आयुष्य सन्मानानं व्यतीत केलंय... त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना हा सन्मान मिळू द्या, अशी विनंती : कपूर, अय्यप्पन आणि मारवाह कुटुंबीय' असंही त्यांनी आपल्या या संदेशात म्हटलंय.
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बोनी कपूरसह मुली जान्हवी आणि खुशी यांनी श्रीदेवीला मुखाग्नी दिला. यावेळी, श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अमिताभ बच्चन, रणधीर कपूर, शाहरूख खान, अर्जुन रामपाल, विद्या बालन, अनिल अंबानी, आदित्य कपूर, फरहान अख्तर असे अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित झाले होते.