मुंबई : लैंगिक शोषणाविषयीच्या दुर्दैवी प्रसंगांविषयी गौप्यस्फोट करत त्या प्रसंगांविषयी जाहीरपणे माहिती देण्याची लाट आता सर्वत्रच पाहायला मिळत आहे.  #MeToo या हॅशटॅगअंतर्गत फक्त कलाविश्वच नव्हे, तर इतरही क्षेत्रातील महिलांनी त्यांच्यासोबतच्या लैंगिक शोषणाचे अनुभव सांगत या साऱ्याचा तीव्र शब्दांमध्ये विरोध केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय प्रभावी अशा या मोहिमेला दर दिवशी एक वेगळं वळण मिळत असून, त्यात अशा काही प्रसिद्ध चेहऱ्यांवर आरोप करण्यात येत आहेत, हे पाहून अनेकांना धक्काच बसत आहे. 


काही दिवसांपूर्वीच चित्रपट दिग्दर्शिका निष्ठा जैन हिने ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. 


विनोद दुआ यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर अद्यापही कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, त्यांती मुलगी, अभिनेत्री आणि स्टँडअप कॉमेडियन मल्लिका दुआ हिने याविषयी निष्ठाला संबोधत एक ओपन लेटर लिहिलं आहे. 


सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या पत्राच्या माध्यमातून मल्लिकाने काही महत्त्वाच्या गोष्टी अतिशय थेट शब्दांमध्ये स्पष्ट करत आपल्या वडिलांना पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होत आहे. 


जर माझे वडील खरंच या साऱ्यात दोषी असतील, तर ही बाब अत्यंत वेदनादायक, खिन्न करणारी आणि अस्वीकारार्ह आहे, असं तिने या पोस्टच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे. 


आपला  #MeToo या चळवळीला पाठिंबा आहेच. पण, उगाचच यामध्ये आपलं नाव उचचलं जाऊ नये, असं म्हणत तिने नाराजी व्यक्त केली. 


ही सर्वस्वी आपल्या वडिलांचीच लढाई आहे, ते ती लढतील आणि मी त्यांना साथ देईन असं म्हणत तिने मोजक्या शब्दांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 



निष्ठाने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विनोद दुआ यांच्यावर आरोप केले होते. 



१९८९ मधील एका प्रसंगाविषयी सांगत नोकरीच्या मुलाखतीसाठी आपण दुआ यांना भेटलो होतो, त्याचवेळी त्यांनी काही अश्लील विनोद केले होते, त्याशिवाय नोकरी मिळेपर्यंत ते आपल्या ममागावरच होते, असे आरोप तिने दुआ यांच्यावर केले होते.