पाहा Video; ती आली, ती गायली आणि ऐकणाऱ्यांनी तिच्यावर कोट्यवधी नोटा उधळल्या....
रसिकांकडून मिळणारी दाद एखाद्या कलाकारासाठी नेमकी किती महत्त्वाची असते हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
वॉशिंग्टन : कलाकार समोर कला सादर करत असताना त्याच्या कलेला भरभरून आणि तितकीच उत्स्फूर्त दाद देणं हे रसिकांचं काम असतं. यामुळंच कलेप्रती असणारी कलाकाराची ओढ आणि कलेवरची त्याची पकड आणखी घट्ट होते. रसिकांकडून मिळणारी दाद एखाद्या कलाकारासाठी नेमकी किती महत्त्वाची असते हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
कारण रसिक मायबाप आणि कलाकारांच्या संतुलित नात्यातूनच आज अनेक असे चेहरे प्रसिद्धीझोतात आले आहेत, ज्यांनी कित्येक वर्षांचा काळ संघर्षात घालवला.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका गायिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिच्या गाण्याचे सूर ऐकल्यानंतर या गायिकेला दाद द्यायची म्हणून रसिकांनी तिच्यावर नोटांची बरसात केली आहे.
अमेरिकेत युक्रेनच्या मदतीसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यावेळी लोकप्रिय गुजराती गायिका गीता बेन यांच्या कार्यक्रमाचं आयोजन तिथं करण्यात आलं होतं.
गीता बेन तिथं आल्या आणि त्यांनी गाणी गाण्यास सुरुवात केली. समोर असणाऱ्या हार्मोनियमच्या साथीनं त्यांनी सुर छेडले आणि ते कानी पडताच समोरील श्रोत्यांनी त्यांना दाद देत नोटांची (अमेरिकन डॉलर्स) बरसात करण्यास सुरुवात केली.
गीता यांच्या गाण्यादरम्यान जवळपास $300,000 (₹2.28 कोटी) इतकी मोठी रक्कम त्यांना प्रेक्षकांकडून मिळाली. ही रक्कम आता युक्रेनच्या मदतीसाठी पाठवण्यात येणार आहे.
सध्या गीताबेन अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी साधारण आठवडाभरआधीच टेक्सास येथे कॉन्सर्ट केला होता. ज्यानंतर त्यांनी लुइसविल शहरात परफॉर्म केलं.
अमेरिकेतील सुरत लेवा पटेल समाज यांच्या वतीनं आयोजित केलेल्या जॉर्जिया प्रांतातील अटलांटा येथे एका कार्यक्रमात त्यांच्या गाण्यावर जवळपास 3 लाख डॉलर्स उधळण्यात आले.